Breaking News

पत्रकार आणि पोलीस, एकाच नाण्याच्या बाजू... तरीही!

नाशिक/कुमार कडलग ।पोलिस समाजाचा अविभाज्य घटक आहे. आधी समाज मग पोलिस हे सुत्र ज्यांनी समजून घेतले त्यांच्या डोक्यात कधीही हवा शिरत नाही. पोलिसांंप्रमाणे पत्रकार हा घटकही त्याच जातकुळीत मोडतो. पोलिस असोत नाही तर पत्रकार दोघांचीही समाजाप्रती सारखी जबाबदारी, ती पार पाडतांना कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा जपणार्‍या महानुभवांच्या डोक्यात प्रतिष्ठेचा अहंकार शिरला नाही तर दोन्ही घटक कर्तव्याला न्याय देण्यात कंजूषी करीत नाहीत. मात्र अहंकार जागा झाला तर कर्तव्य अडगळीत पडते आणि हे दोन्ही घटक एकमेकांना पाण्यात पाहू लागतात. या चढाईत पोलीसांची बाजू नेहमी सरस ठरते असा आजवरचा अनुभव आहे. पोलिसांना असलेले घटनात्मक संरक्षण किंबहूना कायदाच त्यांच्या हातात आहे म्हणून असेल कदाचित पण पत्रकार पोलिसांकडून सतत मार खातांना सर्वदूर दिसतो आहे. पत्रकारीतेत शिरलेले काही पोटार्थी घरभेदीही अशा प्रकाराला जबाबदार आहेत. नाशिकसारख्या जागृत समजल्या जाणार्‍या महानगरातील पत्रकारही या दुर्दैवाला अपवाद नाहीत.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात पत्रकारांवर होणार्‍या हल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या हल्ल्यांची कारणे वेगवेगळी असतील. पण हल्लेखोरांवर कारवाई करतांना पोलिस यंत्रणा हात आखडता घेते. हे हल्ले करणारी जमात एकतर राजकीय क्षेत्रातील मंडळींची पिलावळ असते किंबहूना अवैध धंद्यांच्या चालकांचे हस्तक असतात. या दोन्ही क्षेत्रात असलेले परस्पर संबंध आणि त्या दोघांशी असलेला पोलिस यंत्रणेचा स्नेह हल्लेखोरांवर कारवाई करण्यात अडथळा आणत असावा. इथपर्यंत ठिक आहे. पण स्वतः पोलिसच पत्रकारांना पाण्यात पाहू लागल्याचे दृश्य खेदजनक आणि गंभीर आहे. वास्तविक हे दोन्ही घटक जेंव्हा परस्परांना पुरक भुमिका घेऊन कर्तव्य पार पाडू लागतील तेंव्हा कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट आपली प्रतिष्ठा सांभाळेल. मात्र व्यवहारात तसे घडत नाही. गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना पत्रकारच क्रमांक एकचा शत्रू वाटू लागले आहेत. पत्रकार दिसला की पोलिसांची तळपायाची आग मस्तकाला जाते. कुठले न कुठले कारण काढून पत्रकाराचा पाणउतारा करण्याची अहमहमिका खाकी वर्दीत सुरू आहे. पोलिसांना पत्रकार हा घटक इतका का खटकतो हे रहस्य अद्याप भल्याभल्यांना उलगडले नाही. 
दिवसराञ प्रामाणिकपणे काम करून समाजाला न्याय देण्याच्या भुमिकेत असलेला पत्रकार पोलिसांच्या त्यागाचीही सतत वाहवा करीत असतो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रिदाला न्याय देत पत्रकार समाजातील दुर्जन प्रवृत्तीला ठेचण्याचा प्रयत्न करीत असतो. या दुर्जन प्रवृत्तीवर झालेला हल्ला पसंद न पडणार्‍या खाकी वर्दीतील महानुभवांच्या नजरेत पत्रकार हा खलनायक ठरतो. आणि एक क्रमांकाचा शत्रू म्हणून ती खाकी प्रवृत्ती पत्रकारांचा छळ करते असे ढोबळमानाने म्हणता येईल. अर्थात पोलिस खात्यात सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कर्तव्याशी प्रतारणा करतात असे नाही. 
अनेक पोलिस कर्मचार्‍यांचा आणि अधिकार्‍यांचा सन्माननीय अपवाद आहे त्यांच्या नजरेत पत्रकारांना इज्जत आहे, हे नाकारता येणार नाही. नाशिक शहराच्या संदर्भात बोलायचे झाले तर काही सन्माननीय अपवाद वगळता पोलिस यंत्रणेकडून पत्रकारांची सतत मानहानी केली जाते. विशेषतः वृत्तांकन करतांना कर्तव्य बजावण्याच्या शहाजोगपणाचा नको तितका देखावा करून पत्रकारांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा आणला जातो. हमरीतुमरीवर येऊन प्रसंगी मारहाणही केली जाते. जाब विचारला तर पत्रकारांवर कर्तव्यात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याचे कर्तव्य बजावले जाते किंवा धमकावून तोंड बंद केले जाते. गेल्या आठ दहा दिवसात असे दोन गंभीर प्रकार शहरात घडले आहेत, सुदैवाने शहराचे पोलिस आयुक्त आणि त्यांचे पोलिस उपायुक्त, अन्य काही वरिष्ठ पोलिस अधिकारी समजूतदार आहेत म्हणून परिस्थिती अजून आटोक्यात आहे. मात्र एखाद दुसरी अशा प्रकारची घटना घडणे हे देखील या समजूतदारपणाला भुषणावह नाही.पोलिसांप्रमाणे पत्रकारीतेत शिरलेल्या काही पोटार्थी प्रवृत्तीही खाकीतीतील काही विदूषी प्रवृत्तींचे बळ वाढविण्यात हातभार लावत असल्याचाही दुर्दैवी निष्कर्ष समोर आहे. गरज दोन्ही बाजूने आत्मपरिक्षण करण्याची आहे. तुर्तास इतकेच.