Breaking News

महिला बचतगट स्‍थापन करण्‍याचा प्रयत्‍न : कदम


महिलांच्‍या सक्षमीकरणासाठी आणि प्रगतीसाठी आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद पुढाकार घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍यावतीने बचतगट स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्‍न केले जात आहे, अशी माहिती देवळाली प्रवराचे नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम यांनी दिली. 

येथील कुंभार गल्‍ली परिसरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍यावतीने प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्राच्‍या देवळाली प्रवरा येथील स्‍थानिक कार्यालयाचे उदघाटन नगराध्‍यक्ष कदम यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. ते म्‍हणाले, देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्‍यावतीने शहरामध्‍ये दीनदयाळ अंत्‍योदय योजनेच्‍या माध्‍यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्‍न केले जात आहे. त्‍यामध्‍ये स्‍थापन केलेल्‍या बचत गटांना खेळते भांडवल म्‍हणून १० हजार रुपये देण्‍यात येतात. व्‍यवस्‍थापक महेश वाळुंज यांनी प्रास्‍ताविक केले. सूत्रसंचालन राणी पगारे यांनी केले. कार्यक्रम चांगला पार पडावा, यासाठी समुह संघटक सविता हारदे व रेखा हारदे यांनी विशेष प्रयत्‍न केले. स्मिता शिंदे यांनी आभार मानले.