‘महावितरण’मुळे चिंचोलीच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
आगीच्या या घटनेनंतर तब्बल १२ तासानंतर महावितरणच्या लाईनमनने घटनास्थळी पोहोचून तुटलेली विद्युत वाहिनी बाजूला केली. महावितरणच्या या ढिसाळ व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या वर्तनाने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चिंचोली येथे नगर - मनमाड राज्य महामार्गालगत ब्राम्हणे यांची शेती आहे. येथेच ते वास्तव्यास आहेत. बुधवारी {दि. २१} सायंकाळी ६ च्या सुमारास जनावरांना चारा वैरण करून ते घरासमोर बसले असताना त्यांच्या ऊसाच्या शेतावरून गेलेल्या व लोंबकळत अवस्थेत असलेल्या वीजवाहिनीत वाऱ्याने एकमेकांमध्ये घर्षण झाले. त्यातून एकदोनदा ठिणग्या पडल्याचे दिसले. मात्र तिसऱ्या वेळेला अचानक मोठा आवाज होऊन आगीचा लोळ ऊसाच्या शेतात पडताना दिसला त्याक्षणी ऊसाने पेट घेतला. विशेष म्हणजे या शेताजवळच हाकेच्या अंतरावर मोठी लोकवस्ती आहे. पण सुदैवाने ती या अग्नितांडवातून बालंबाल बचावली. कामगार तलाठी डोखे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.