साई संस्थानच्या आजी-माजी प्रमुखांच्या तक्रारी दाखल
शिर्डी / प्रतिनिधी - साईबाबा संस्थानचे मंदीर प्रमुख राजेंद्र सोपानराव जगताप यांनी निवृत्त मंदीर प्रमुख रामराव रंभाजी शेळके {रा. शिर्डी} यांच्या विरोधात शिर्डी पोलिसात तक्रार दिली. दि. ७ मार्च २०१८ रोजी साईमंदीरात कर्तव्यावर असताना ३:३० च्या सुमारास शेळके हे दर्शनासाठी आल्यानंतर ‘समाधीवरील कपडे काढून दर्शन घेऊ नका’ असे सांगितले असता राग आल्याने ‘तुझ्याकडे पाहतो, कसा ड्युटी करतो, हातपायच तोडतो, असा दम दिल्याची तक्रार राजेंद्र सोपानराव जगताप यांनी शिर्डी पोलिसात दिली. दरम्यान, दुसरी तक्रार निवृत्त साईमंदिर प्रमुख रामराव रंभाजी शेळके यांनी ‘आपण ७ मार्च २०१८ रोजी पहाटे ५:४० च्या सुमारास साईदर्शनासाठी मंदिरात गेलो असता मागील भांडणाच्या वादातून वाईट बोलून शिवीगाळ करून मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दिली. शिर्डी पोलिसांनी दोघांविरुद्ध परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो. नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप मंडलिक माघाडे हे करीत आहेत.