आंदोलनासाठी कर्जत-जामखेडमधून दिल्लीकडे शेतकरी रवाना
दिल्ली येथे होणार्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जामखेड कर्जत मतदार संघाचे प्रतिनिधी व जिल्हाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातुन 200 कार्यकर्ते व शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शेतकर्यांचे प्रश्न, जनलोकपाल व लोकायुक्त नियुक्ती यांची तत्काळ अंलबजावणी व्हावी, यांसह विविध मागण्यांसाठी आजपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ धोंडपारगाव, अरणगाव, झिक्री, पाटोदा सांगवी, पिंपळगाव आवळा, बावी, धोत्री, शिऊरसह तालुक्यातील 200 शेतकरी बसने दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार, गुलाब जांभळे, प्रा. मधुकर राळेभात, महेश यादव, भिमराव लेंडेंसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंलबजावणी करावी, तसेच शेतीउत्पादन खर्चावर अधारीत बाजार भाव मिळावा, 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकरी व शेतमजुरांना महीना 5 हजार पेन्शन मिळावी, निवडणूकविषयी सुधारणा करावी, यांसह विविध मागण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. अण्णांच्या आंदोलनसाठी जामखेड तालुक्यातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुक्यातील 200 शेतकर्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करुन या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.