आगामी हंगामात 9 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट : अध्यक्ष नागवडे
यावर्षीच्या हंगामात नागवडे साखर कारखान्याने कमी दिवसात विक्रमी गाळप केले आहे.सामुहीक प्रयत्नांतून हंगाम यशस्वी पार पडला आहे. पुढील वर्षीच्या हंगामात यावर्षीच्या तुलनेत अधिक ऊस उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामात 9 लाख मेट्रीक ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे प्रतिपादन नागवडे साखर कारखाण्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. यावर्षीच्या हंगामात नागवडे कारखान्याने कमी कालावधीत विक्रमी गाळप करीत साडे सहा लाख मेट्रीक टनावर गाळप करुन जवळपास सव्वा सात लाख पोती साखर उत्पादीत केल्याचे त्यांनी सांगितले.
नागवडेच्या 44 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक अॅड. सुनिल भोस, सोपान खोमणे व ऊस तोड मुकादमांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नागवडे म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारची धोरण शेतकरी व सहकाराला मारक आहेत. सहकारी साखर कारखानदारी संक्रमण अवस्थेतून वाटचाल करीत आहे. काटकसरी व पारदर्शी कारभार करुन सभासद व शेतकर्यांना नेहमीच मदत करण्याची मनागवडेच्या व्यवस्थापनाची परंपरा आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडेंच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यंत्रसामुग्रीत आवश्यक बदल करुन पुढील हंगामात प्रतिदिन सहा हजार मेट्रीक टनावर गाळप करण्याचा माणस आहे. कारखान्याची डिस्टीलरी लवकरच सुरु होणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, शेतकर्यांनी आता पाणी बचतीचे महत्व ओळखणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही. पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देवून शेतकर्यांनी अधिक उत्पन्न देणार्या वाणांची पिके घ्यावीत. शेतकर्यांनी एकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहून शेतीत नविन प्रयोग करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले की, यावर्षी देशात व राज्यात विक्रमी ऊस, साखरेचे उत्पादन झाल्याने साखरेच्या भावात घसरण झाली. त्याचा परिणाम ऊस दरावर झाला आहे. साखर दरातील घसरणीमुळे साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. अन्य शेतमालाचे दरही कोलमडले आहेत. टोमॅटो, कोथिंबीर यासारखी पिके शेतकरी दराअभावी रस्त्यावर टाकून देत आहेत. नागवडेचा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यात शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार व ऊस तोडणी मजूरांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी यावेळर सांगितले.
यावर्षीच्या हंगामात सर्वाधिक ऊस तोड, वहातुक करणार्या ऊसतोडणी टोळी मुकादमांचा व मजूरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. यावेळी मा. सभापती अरुण पाचपुते यांचे भाषण झाले. कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, विश्वनाथ गिरमकर, राजकुमार पाटील, विजय कापसे, विलास काकडे, शिवाजी जगताप, श्रीनिवास घाटगे, अॅड. अशोक रोडे, जेष्ठ कार्यकर्ते उत्तम नागवडे, बाबासाहेब भोयटे, नितीन वाबळे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब बांदल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर शेतकी अधिकारी शशिकांत आंधळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, शेतकरी, सभासद, कामगार व ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.