Breaking News

तिजोरीतील उंदीर मंत्रालयात खेळवून मारण्याचे वाळके कांड अखेर चव्हाट्यावर

मुंबई/ विशेष प्रतिनिधी ;- राज्याच्या तिजोरीत शब्दशः उंदीर खेळत असतांना मंत्रालयात अवघ्या सात दिवसात सव्वा तीन लाख उंदीर मारण्याचा प्रेसीडन्सी साबां विभागाचा भातुकलीचा खेळ भाजपाच्या सदस्यांनी विधानसभेच्या वेशीवर टांगल्याने डेब्रीजसह आमदार निवास अपहार प्रकरणी चर्चेत असलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांचे सहकारी अभियंता यांच्या भ्रष्ट कार्यशैलीवर सभागृहात शिक्कामोर्तब झाले. दरम्यान सन 2016 मध्ये अवघ्या सात दिवसात मारलेल्या लाखो उंदरांची मुंबईत कसे आणि कुठे विल्हेवाट लावली ? आरोग्य विभागाशी समन्वय साधला का? हे महानगराच्या आरोग्याशी संबंधीत प्रश्‍न मात्र हे प्रकरण गंभीर वळणावर नेण्यास निमित्त ठरण्याचे संकेत देत आहेत.


शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आकाशवाणी, मनोरा आमदार निवास कक्षात झालेला अपहार आणि मंत्रालयातील डेब्रीजच्या शेकडो ट्रक्स प्रकरणाचा अपहार चर्चेत आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि मुंबईत सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचा भ्रष्टाचाराच्या जातकुळीतील अनियमितता, अपहार या बाबींवर सभागृहात वादळ निर्माण झाले आहे. या वादळाला शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळात झालेल्या अपहाराचे अमुल्य योगदान आहे. प्रज्ञा वाळके यांच्या मनोरा आमदार निवास कक्ष, डेब्रीज प्रकरण कारवाईच्या कक्षेत असतांना मंत्रालयातील लाखो उंदीर मारण्याचे प्रकरण विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केल्याने शहर इलाखा साबांच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यात कुशल आहेत, हे सिध्द झाले.
शहर इलाखा साबां विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा कारभार पहात असताना प्रज्ञा वाळके, उपअभियंता अशोक बागूल, शाखा अभियंता रेश्मा चव्हाण यांनी मंत्रालयातील उंदीर मारणाचे कंत्राट प्रस्तावित केले. दि. 3 मे 2016 ते 10 मे 2016 या सात दिवसात 131 व 132 या क्रमांकाच्या दोन वर्क आर्डर काढून तब्बल 319400 उंदीर मारण्याचा पराक्रम केला. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मिळवलेल्या माहीतीच्या अधिकारातून ही माहीती उघड केली आहे.
उंदीर मारण्याच्या या पराक्रमाचा करार करताना कामाचा कालावधी सहा महिने दाखवला आहे. वर्क आर्डरमध्ये हेच काम दोन महिन्यात करावे असे नमुद केले आहे. आणि जलद प्रशासनाची जादू दाखवतांना हे काम अवघ्या सात दिवसात पुर्ण केल्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत केली आहे. सात दिवसात सव्वा तीन लाख उंदीर मारले याचा अर्थ प्रत्येक दिवशी साडे पंचेचाळीस हजार उंदीर मारण्याचे काम प्रगतीपथावर ठेवल्याचे मोजमाप पुस्तिकेतील नोंदी दाखवितात. हीच सरासरी तासाला एकोणाविशे, मिनिटाला जवळपास बत्तीस उंदीर मारले गेलेत. या आकडेवारीवरून प्रत्येक दिवसाला मारले गेलेल्या उंदरांचे वजन नऊ हजार किलोपेक्षा अधिक होते. म्हणजे दररोज एक ट्रक.उंदीर मारण्यासाठी वापरले गेलेले विष, मारले गेलेल्या उंदरांचे दफन या सर्व बाबी संशयास्पद आहेत. हे प्रकरण कसे हाताळले? कशा पध्दतीने बनाव केला याविषयी सविस्तर तपशील उद्याच्या अंकात.
सोमवारच्या अंकात(क्रमशः)
मंत्रालयातील पेव्हर ब्लॉकचे भुत झाले जागे
शहर इलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून रणजीत हांडे कार्यरत असताना मंत्रालयात बसविण्यात आलेल्या एस आकाराच्या पेव्हर ब्लाकचा अपहार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचे औचित्यही भ्रष्टाचारापासून दुर ठेवण्याचे भान ठेवले नाही. या संदर्भात तपशीलवार वृत्त मालिका सोमवारपासून...