Breaking News

पुण्यात 9 मार्चपासून कृषि महोत्सवाचे आयोजन

पुणे : सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील जन्म शताब्दी वर्षानिमित्त कृषि महोत्सव 2018 पुणे या कार्यक्रमाचे आयोजन 9 ते 13 मार्च या कालावधीत ग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचन नगर, पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी दिली.
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यत पोहोचविणे. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण करणे, समुह, गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा तसेच ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे,खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.कृषि महोत्सवाचा कालावधी 5 दिवसांचा असून प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये कृषि प्रदर्शन,सेंद्रिय धान्य महोत्सव, सहकार परिषद, खरेदीदार-विक्रेता संमेलन व कृषि सन्मान पुरस्कार इ. कार्यक्रमाचा समावेश आहे.
कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकिय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खादय पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. यामध्ये कृषि व कृषि संबंधित विभाग, कृषि विदयापीठे, कृषि विज्ञान केंद्र, संबधित विविध कृषि महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये परिसंवाद, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असून कृषि शास्त्रज्ञ, कृषि व संलग्न विभागातील तज्ज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त, प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उदयोजक, यशस्वी महिला शेतकरी, उद्योजिका यांची व्याख्याने आयोजीत करण्यात येणार आहेत.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यामध्ये सेंद्रिय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सबंध महाराष्ट्रातून सेंद्रिय शेतीच्या गटाची शेती उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार मालाची विक्रीव्दारे श्रृंखला विकसीत करण्यास प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातुन विविध सार्वजनिक खाजगी भागिदारातुन(पी.पी.पी.) चालु प्रकल्प, कृषि माल प्रक्रिया उदयोजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या एकत्रित सुसंवादाकरीता सर्व घटक एका व्यासपीठावर आणून बाजाराभिमुख कृषि विस्ताराला चालना देण्याचे काम करण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री, कृषि मंत्री, सहकारमंत्री, कृषी राज्यमंत्री उपस्थीत राहणार आहेत. तसेच या पाच दिवसाच्या महोत्सव कालावधी मध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत राहणार आहेत, असेही इंगळे यांनी सांगितले आहे.