Breaking News

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्याचे 88 कोटी वीजबिल थकीत

सातारा,(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्याच्या वीजबिलांची 88 कोटी थकबाकी आहे. थकबाकी न भरल्यास महावितरण वीजपुरवठा खंडित करू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधी, 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकबाकी भरावी, अशा सूचना शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. 

ग्रामविकास विभागातर्फे 28 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र देण्यात आले असून या पत्रात सदर सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कधीही पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करू शकते, अशी शक्यता ग्रामविकास विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करावा, अशा स्पष्ट सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण 4 हजार 396 जोडण्या असून त्यांच्याकडे जवळपास 88 कोटी 78 लाख रुपये थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींनी पथदिव्यांच्या वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.