Breaking News

दहावी-बारावी परीक्षा केंद्रात कर्मचार्‍यांनाही मोबाईल बंदी

रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - दहावी आणि बारावीची पेपरफुटी रोखण्यासाठी यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसली असून प्रश्‍नेपत्रिकांच्या वितरणात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर मंडळाने आता परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक व इतर सर्व कर्मचा-यांनादेखील मोबाईलबंदी केली आहे. यामुळे पेपरफुटीचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


गेल्या चार वर्षांपासून परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्‍नपत्रिका अथवा त्यातील काही प्रश्‍न येण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकारांना आळा बसावा, यासाठी यावर्षी परीक्षांच्या नियमांत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यात परीक्षार्थींना 11 वाजल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रश्‍नपत्रिकांचे वितरण करताना 25 प्रश्‍नपत्रिकांचे एक पाकीट तयार केले जाणार आहे. हे मोहोरबंद पाकीट पर्यवेक्षक वर्गात विद्यार्थ्यांच्या समक्ष उघडणार आहेत. यामुळे प्रश्‍नपत्रिका पाकिटातून काढून त्याचे वर्गनिहाय वितरण करण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच त्याची सुरक्षाही वाढणार आहे. त्यातच आता परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख वगळता कोणालाही मोबाइल नेता येणार नाही. सर्वांना आपले मोबाइल केंद्रप्रमुखांक डे जमा करावे लागणार आहेत. परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी चप्पल, बूट, दप्तर बाहेर ठेवून बाहेर ठेवल्यानंतर परीक्षागृहात प्रवेश दिला जात होता. यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यवेक्षक तसेच इतर शिक्षकेतर कर्मचा-यांचे मोबाइल केंद्रप्रमुखाकडे जमा करण्यास सांगण्यात येणार आहे. केंद्रप्रमुखाला आयत्यावेळी येणा-या अडचणी सोड विण्यासाठी मंडळाशी संपर्क साधावा लागतो. यामुळे केंद्रात केवळ त्यांनाच मोबाइल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षार्थी वेळेपूर्वी परीक्षा हॉल सोडणार असेल तर त्याला त्याची प्रश्‍नपत्रिकादेखील पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जनजागृतीबरोबरच काही कडक निर्बंधही परीक्षा मंडळाने घातले आहेत.