Breaking News

सत्ताधारी व विरोधकांमध्ये शेतकरी भरडला जात आहे - डॉ. तानाजी चोरगे

रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - सध्या सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये सामान्य शेतकरी भरडला जात आहे. राजकारणाकरिता त्याचा वापर होत आहे. तो टाळून थांबवला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन शेतक-यांकरिता आपण काय करू शकतो हे ठरवले पाहिजे व ते अमलात आणले पाहिजे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले. दापोली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचा पंचावन्नावा वर्धापन दिन संघाचे अध्यक्ष सुधीर कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यालयाच्या आवारात उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. चोरगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


यावेळी डॉ. चोरगे पुढे म्हणाले की, विविध कारणांनी शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. त्याला यांत्रिकीकरणाची जोड देऊन पुन्हा शेतीत आणण्याचा दूरगामी विचार सुधीर कालेकर यांनी केला आहे. कालेकर यांनी दापोली खरेदी-विक्री संघ तोट्यातून नफ्यात आणला आहे. विविध कार्यकारी सोसायट्या चांगल्या चालल्या तरच संघ चांगले काम करेल. दापोलीतील सोसायट्या चांगले काम करत आहेत. म्हणून दापोली खरेदी-विक्री संघ नावारूपाला आला आहे. यापुढे ज्यांना सहकारातील कळते त्यांनीच या क्षेत्रात यावे. नोटाबंदीच्या काळात तो निर्णय योग्य प्रकारे राबवणारी राज्यातील रत्नागिरी जिल्हा बँक ही एकमेव बँक होती, असेही त्यांनी सांगितले.
सुधीर कालेकर यांनी सहकार तळागाळात रुजला पाहिजे असे स्पष्ट केले. जयवंत जालगावकर यांनी दापोली खरेदी विक्री संघाच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात शेतकर्यांलना शेतीसाठी लागणा-या अवजारे, बीबियाणे, कीटकनाशके यांच्या दालनाचे उद्घाटनही करण्यात आले. किसान क्राफ्टच्या वतीने शेती अवजारांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.