लाभले भाग्य तालुक्यास मिळाले कर्तव्यदक्ष अधिकारी! कॉपीमुक्त परिक्षा अभियानाची झाली यशस्वी सुरुवात !!
दहावी-बारावीच्या परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन महिन्यांपासून तहसिलदार नामदेव पाटील व तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तालुक्यात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजीत करुन या परिक्षा कॉपीमुक्त करण्याचा इशारा दिला होता. यावर कळस म्हणून पाथर्डी भागाचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करुन रणनिती ठरवण्यात आली. आणि बारावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी, ती कमालिची यशस्वी झालेली दिसून आली. त्यामुळे दरवर्षी परिक्षा कालावधीत होणारा सावळा गोंधळ यावर्षी एकदमच गप्पगार झाला. शहरातील सर्व परिक्षा केद्रांवर नीरव शांतता दिसत असल्याने ही ट्रिटमेंट चपखल लागू पडल्याची खात्री झाली.
लक्षावधी रुपयांची बेगमी करणाऱ्या संस्थाचालकांचा मात्र त्यामुळे पुरता हिरमोड झाला. वर्षभर शाळेत हजर न ठेवता बारावीच्या परिक्षेत मालदारांच्या,श्रीमंतांच्या दिवट्यांना हमखास उत्तीर्ण करण्याची ग्वाही देत, त्याबद्दल २०,०००/- ते ५०,०००/- रुपयांची प्रती परीक्षार्थी रुपये आकारणी करुन गडगंज पैसा कमावण्याचा नवीनच मार्ग काही संस्थांचालकांनी शोधून काढला होता. परंतु प्रांताधिकारी आणि तहसिलदार या कप्तान उपकप्तानांच्या तडाखेबंद खेळीमुळे अशा महाभागांचा जुगार हा त्यांच्याच अंगलट आला. लॉजेस, हॉटेल्स व चहा, वडापाव, पानटपऱ्यांच्या या कालावधीतील कमाईत कैक पटीने होणाऱ्या वाढीत यंदा काही फरक पडणार नसला तरी पुढच्या वर्षापासून त्यालाही खीळ बसू शकते.
कारण यंदा हजारो रुपये मोजून हमखास उत्तीर्ण होण्याच्या अपेक्षेने आलेले परजिल्ह्यातील पाहुणे विद्यार्थी, निदान परिक्षा संपेपर्यंत तरी पाथर्डीला मुक्काम करतील. परंतु यंदा अपेक्षाभंग झाल्यामुळे ते पुढच्या वर्षी पाथर्डीला येतीलच याची शाश्वती देता येणार नाही. कारण प्रांताधिकारी व तहसिलदार साहेबांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ते निदान यंदा तरी हमखास नापास होणार आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कॉपीमुक्तीसाठी युक्तीच इतकी नामी शोधून काढली आहे की, हमखास पास करण्याची हमी देणाऱ्या यंत्रणांना पास करणाऱ्यांपर्यंत कॉपीची रसद पोहचविता येणे अशक्य होऊन बसले आहे. हमखास पास करुन देण्याच्या ग्वाहीतील तीच एकमेव मुख्य गोम होती. नेमकी तिच्यावरच गदा येणार असल्यामुळे अशा 'ढ' विद्यार्थ्यांना पास करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या संस्थाचालकांकडे दुसरा काही एक मार्ग उरला नाही.
दस्तुरखुद्द प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल व तहसिलदार नामदेव पाटील या कर्तव्यात कसलीही तडजोड न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक, माध्यमिक व निरंतर शिक्षण विभागाची तीन भरारी पथके त्यांच्या दिमतीला असणार आहेत. महसूल कर्मचाऱ्यांचे एक पथकही मुद्दाम तैनात करण्यात आले आहे.तालुक्यातील दहाही परिक्षाकेंद्रांच्या आवारांत परिक्षेच्या कालावधीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाचा कोणताही घटक कॉपी पुरविताना आढळून आल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे.
त्यामुळे बाहेरुन कॉपीपुरवठा होण्याचे सर्व मार्ग बंद झाले असल्याने कॉपीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना दुसरा तरणोपाय उरला नाही. अचानक निर्माण झालेल्या अशा परिस्थितीमुळे ज्यांना हमखास पास करण्याची ग्वाही देऊन ज्यांच्याकडून अमाप पैसे उकळले त्यांचे करायचे काय? हा यक्षप्रश्न त्यांना हमखास पास करुन देणारांसमोर उभा राहिला आहे. वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र खरा न्याय मिळणार असल्याने त्यांचे पालक व असे विद्यार्थी समाधानी पावले आहेत. पाथर्डीकरांना यंदा प्रथमच असा अनुभव प्रत्ययास येऊ लागल्याने प्रांताधिकारी, तहसिलदार व गटशिक्षणाऱ्यांबद्दल आदरपुर्वक उद्गार ऐकायला मिळत आहेत.