‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’तील गुंतवणुक धूळफेक : पृथ्वीराज चव्हाण
सरकारचा मेक इन महाराष्ट्र हा कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यांची आकडेवारी फुगवलेली आहे. त्यामधील फक्त 838 प्रकल्प कार्यान्वित आहेत. केवळ 42 हजार 146 इतकी रोजगार निर्मिती झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकडेवारी फुगवून दाखवत आहेत. 5 लक्ष कोटी गुंतवणूक झाल्याचा दावा सरकार करत आहे. ही गुंतवणूक कुठे आणि कधी झाली यांची महिती सरकारने द्यावी. सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे ही फक्त जाहिरातबाजी आहे. गुजरातच्या विकासदरापेक्षा ( 8 टक्के) महाराष्ट्राचा विक ासदर (7.3 टक्के) कमी आहे. विकासदारात महाराष्ट्र 8 व्या क्रमांकावर आहे. अॅपलचे फोन पुण्यात तयार होणार, असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, तीन वर्षात काहीही झाले नाही. जनरल मोटर्सचा प्रकल्प पुण्यात आणण्याची घोषणाबाजी केली पण पुढे काही झाले नाही. रोजगार निर्मितीसाठी रोजगार सदन व्यवसायाला चालना देणे आवश्यक होते. मात्र, यात महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर आहे. हे उत्साहजनक आकडे नाहीत अशी टीका चव्हाण यांनी केली.
हायपर लूप हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे. हायपर लूप या योजनेसाठी व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या समवेत 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मात्र, ही गुंतवणूक राज्य सरकार, केंद्र सरकार अथवा ब्रॅन्सन करणार हे सरकारवे स्पष्ट करावे. तसेच याबाबतचे आर्थिक निकष जाहीर करावेत. हायपर लूप हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न दाखवून पुणेकरांची सरकार फसवणूक करत असून लोकांना रोजगार हवे आहेत त्यामुळे स्वप्नं दाखवून लोकांची फसवणूक करू नये अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.