Breaking News

राधाकृष्ण विखेंच्या विरोधाची धार वाढली! दक्षिणेत सुजय बाजी मारणार ?


राज्य सरकारमध्ये विरोधी पक्षनेता या पदाला अनन्यसाधारण असे महत्व. कारण या पदावर सत्ताधारी सरकारवर मजबूत पकड ठेवणे शक्य होते. एका अर्थाने हे पद मुख्यमंत्र्यांच्या तोडीचे पद आहे. मात्र हे पद सांभाळणारी व्यक्ती तितकी सक्षम, अभ्यासू, आणि कणखर असणे महत्वाचे असते. महाराष्ट्राच्या जनतेचे सुदैव असे, की राधाकृष्ण विखेंच्या रूपाने राज्याला खमक्या विरोधी पक्षनेता लाभला. विशेष म्हणजे अलीकडे विखेंच्या विरोधाची धार मात्र कमालीची वाढल्याचे जाणवते आहे. त्यात त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी नगर दक्षिण पिंजून काढल्याने लोकसभेला तेच बाजी मारतील, अशी अनुकूल परिस्थिती पहायला मिळत आहे.
भीमा-कोरेगाव दंगलीचा विषय असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, कपाशीवर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव, ऊस दराचा प्रश्न, राष्ट्रीयीकृत बँकांचे राज्यातील धोरण आदी कुठल्याही प्रश्नावर विखेंनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या त्यांच्या कथित मैत्रीचा प्रचंड गवगवा झाला. एका अर्थाने मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त प्रसिद्धी विखेंना मिळाली, असे म्हटल्यास अतिशयोक्ति ठरणार नाही.

राज्यातील प्रत्येक प्रश्नावर विखे यांनी सरकारला जेरीस आणले. या सरकारने फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र निर्माण केल्याची टीका करतांना विखे यांनी सरकारची मानसिकताच जनतेसमोर आणली. दरम्यान, राज्यात गाजलेल्या भीमा कोरेगाव दंगलीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका अजिबात गंभीर नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. यासाठीच राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याचे त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. 

या गंभीर प्रकरणाची विद्यमान न्यायाधिशांमार्फतच चौकशी व्हायला हवी होती. परंतु, सरकारने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. त्यातही या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याने सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सडेतोड मत विखे यांनी मांडले. यावरून सरकारवर त्यांची मजबूत पकड असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, पदमश्री डॉ. माजी खा. स्व. बाळासाहेब विखेंच्या कार्यपद्धतीची जणूकाही झेरॉक्स कॉपीच ज्यांच्या कार्यपद्धतीत पहायला मिळते, मग ते कार्यकर्त्यांना जीव लावणे, विकासकामांच्या पाठपुराव्यात कुठेही कमी न पडणे आणि सार्वजनिक उत्सवात स्वतःचे अतिसामान्य मानणारे डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणमधून खासदारकी लढविण्याचे संकेत दिले असून दक्षिण जिल्हा त्यांनी आत्ताच पिंजून काढला असताना अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीत तेच बाजी मारतील, असा या भागातील राजकीय अभ्यासकांचा व्होरा आहे. 

डॉ. विखे याना भेटले, की माजी खा. स्व. विखेंना भेटल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील बायबापडे व्यक्त करीत आहेत. अर्थात लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. त्यात विद्यमान लोकप्रतिनिधींविषयी संपूर्ण नगर दक्षिणमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकालाचा गुलाल डॉ. विखेंचेच कार्यकर्ते उधळतील, अशी अनेकांना खात्री आहे.