Breaking News

महिलांना उद्योग क्षेत्रात मोठा वाव : महिला उद्योजकांच्या चर्चासत्रातील सूर


देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात, त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर मोठे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे मत महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. महिलांना उद्योग क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास त्यांनी स्वत:ला कोणत्याही पातळीवर कमी न समजता पूर्ण आत्मविश्वासाने आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करत वाटचाल करणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत आज यासंदर्भात आयोजित चर्चासत्रात सहभागी महिला उद्योजकांनी हे मत व्यक्त केले. या चर्चासत्रात कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटनमंत्री बर्दीश छग्गर, भारतातील स्वीडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन, मेट्रोपॉलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमिरा शाह, मल्टिप्लेस अल्टर्नेट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणुका रामनाथ, इस्त्रोच्या उप प्रकल्प संचालक मिनल संपथ, हे दिदीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय, ॲमेझॉन कंपनीच्या संचालक अर्चना वोरा यांनी सहभाग घेतला.