Breaking News

अन्न प्रक्रिया व वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी



मुंबई : वस्त्रोद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. मात्र पॅकेजिंग व ब्रँडिंग प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आपल्या उत्पादनाला केवळ देशातच नाही तर जागतिक बाजारपेठेत मागणी वाढावी असे वाटत असेल तर आकर्षक पॅकेजिंग व उत्तम ब्रँडिंग काळाची गरज आहे. यातूनसुद्धा रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र हे रोजगार निर्मितीत अग्रेसर राज्य असून मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा सूर चर्चासत्रात उमटला. मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 या गुंतवणूकदाराच्या परिषदेत आयोजित एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज (प्रक्रिया उद्योग व वस्त्रोद्योग) या विषयांवरील चर्चासत्रात गौतम सिंघानिया, अनिशा धवन, अवनी दावडा, जमशेद दाबू, लार्स दिथमेर व संकल्प पोटभरे हे उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचलन अनिशा धवन यांनी केले.

‎'सबका साथ सबका विकास' साकार करायचे असल्यास रोजगार निर्माण करावे लागतील. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे उद्योग राज्य आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण होतील तेव्हा आपसूकच विकास दर वाढेल. महाराष्ट्रात उद्योगाला सकारात्मक वातावरण आहे. महाराष्ट्र हे मूलभूत सुविधा पुरविणारे सर्वात अग्रेसर राज्य आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात रेमंड ने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे. यापुढे ही रोजगार निर्मितीला रेमंडचे प्राधान्य राहणार आहे.

1925 ला रेमंड ग्रुपची स्थापना झाली आहे. चारशे पेक्षा जास्त शहरात रेमंड व्यवसाय सुरू आहे. 150 रुपयांपासून ते 3 हजार रुपये मीटरपर्यंत रेमंडचे कापड उपलब्ध आहे. मेक इन इंडिया नंतर रेमंड ने महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात खूप भरारी घेतली असल्याचे गौतम सिघांनिया यांनी सांगितले.