Breaking News

देश - विदेशातील पर्यटक, कलारसिकांच्या उपस्थितीत एलिफंटा महोत्सवाचा शुभारंभ


देश - विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या एलिफंटा महोत्सवाचे आज घारापुरी लेण्यांवर बहारदार आणि क्लासिकल अशा कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटा लेण्यांच्या परिसरात तब्बल 9 वर्षानंतर हा महोत्सव होत असल्याने यंदा त्याचे विशेष आकर्षण आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते आज सायंकाळी या शानदार सोहळ्याचा शुभारंभ झाला. आजच्या कार्यक्रमास मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्राचीन टेम्पल डान्सेसमध्ये विशेष नैपुण्य असलेल्या जिया नाथ आणि ओडिसी नृत्यकार सनातन चक्रवर्ती यांच्या 'डान्स ऑफ लव्ह' या क्लासिकल सादरीकरणाने दर्शकांना मोहित केले.
त्यानंतर रात्री उशिरा तबलावादक संगिता त्रिवेदी यांचे सादरीकरण आणि सुमित नागदेव डान्स आर्टस् यांच्यामार्फत ‘ध्रुत’ हा कलाप्रकार सादर झाला. कलाकारांनी विविध नृत्य, संगीत आणि कलांच्या सादरीकरणातून देश - विदेशातील पर्यटक आणि कलारसीकांचे लक्ष वेधून घेतले. यंदा महोत्सव लेण्यांच्या परिसरात होत असल्याने पर्यटक आणि कलारसिकांनी त्याचे स्वागत केले. मागील ९ वर्षापासून सुरक्षेच्या कारणास्तव महोत्सव गेट वे ऑफ इंडिया येथे होत होता.