Breaking News

खेळण्या बागडण्याच्या वयात तारेवरची कसरत शिक्षणापासून वंचित

भारत देश महासत्ता होण्याकडे सर्व स्थरातून आगेकुच करत असताना, आजही मिना सारख्या दहा वर्षीय डोंबारी समाजाच्या बालीकेस कुंटुबासमवेत तारेवरचे खेळ अथवा जीवघेण्या कसरती करून कुटुंबाच्या मदतीने आपल्या पोटाची खळगी भरावी लागते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शासन लक्ष देत नसल्याची खंत डोंबारी कुटुंबाने व्यक्त करत आहेत.


देश महासत्ता होण्याच्या वाटचालीवर प्रवास करत असताना वेगवेगळ्या स्तरांमधून प्रगती होऊन देश आधुनिक समृद्ध तसेच तंत्रज्ञानाने पुढे जाऊन देश आणि देशातील सर्व स्तरांतील नागरिक सुखी आणि संपन्न व्हावेत यासाठी केंद्रसह राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनेक उपाय योजले जातात, ते अंमलात आणून जनसामान्यांपर्यंत पोहचवून देशातील सर्वांना संविधानाप्रमाणे न्यायासह हक्क मिळवून सर्व स्तरातील व जाती धर्मातील लोकांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असताना, आजही देशातील भटकंती करून जीवन जगणार्‍या भटक्या व बारा बलुतेदारांची अवस्था अतिशय दयनीय असून, पोटाच्या खळगी साठी लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला जीव धोक्यात घालून, नानाविध जीवघेण्या कसरती करून आपले पोट भरावे लागत आहे, एका ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही, जीवनाचा ठावठिकाणा नाही, अशी बिकट अवस्था असताना दहा वर्षे वयाची असणार्‍या मिनाला आजदेखील आपल्या कुंटुबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या लहान भाऊ छकुला, आई-वडील आणि ताई, आत्यासोबत गावोगावी भटकंती करत आपल्या अनेक चित्तथरारक कसरती चौकाचौकांत करून दाखवत कुंटुबाची व आपली दैनंदिनी चालवत आहे, 

मीना दहा वर्षांची मुलगी असून शिक्षणाची इच्छा असताना शिकू शकत नाही, तसेच डोंबारी असल्याने पिढयापार चालत आलेल्या परंपरेने आई वडीलांच्या मागे फिरून, घरदार, शेती-वाडी, शिक्षण सोडून केवळ कला सादर करूनच जीवन जगावे लागते, त्यामध्ये तारेवर चालने, दातानी हंडा उचलने, चिमूरडयाला काठीवर बांधून नाचणे, आपला पाळीव कुत्रा व त्याच्या बरोबर कसरती करणे, काचेच्या बाटलीवर नाचणे, सायकलवर कसरत करणे, फळीवरील डमरू नृत्य तसेच आदी अनेक धोकादायक कसरती करून, बघणार्‍याकडे बक्षीसाची अपेक्षा करावी लागते, जो देगा उसका भला जो ना देगा उसकाभी भला, या म्हणीप्रमाणे मिळेल त्यात समाधान मानून आम्ही आमचे जीवन जगतो शासनाकडून अपेक्षा आहेत परंतु शासनाचे आमच्याकडे लक्ष नाही, शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमची जीवनशैली जगता येईल, आमच्या मुलाबाळांना शिक्षण मिळेल, आमची भटकंती थांबेल असे काही तरी करावे, अशा केवीलवाण्या शब्दांनी मीनाच्या डोंबारी कुटुंबाने दैनिक लोकमंथनच्या प्रतिनिधीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या, शासन यांच्याकडे लक्ष देऊन, यांची भटकंती थांबवेल का व भटक्याची मुले शिक्षण घेऊन स्वावलंबी होतील का हाच प्रश्‍न खर्‍या अर्थाने उपस्थित होत आहे.