Breaking News

घारगाव ग्रामस्थांसमोर प्रशासनाने टेकवले हात

मागील पंधरा दिवसांपासुन जिल्ह्यात चर्चेत आलेल्या घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ग्रामस्थ व पालक यांचे सामुहीक आत्मदहन सर्वत्र गाजले. यावर प्रशासनाला अखेर घारगाव ग्रामस्थांसमोर हात टेकवावेच लागले. जिल्हा परीषद शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन त्यांना येत्या मार्च अखेरीस शाळा खोल्या निधी मंजुरी व 8 शाळा खोल्या बांधकाम सुरु करण्याची जबाबदारी घेवून त्यांचे प्रतिनिधीमार्फत सर्व ग्रामस्थांना लेखी आश्‍वासन देण्यात आले, यावेळी मार्चपर्यंत ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगीत केले. 


घारगाव गावठाणातील 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पावसामुळे शाळा कोसळली. या अगोदर ग्रामस्थांनी 24 सप्टेंबर रोजी शाळेची अवस्था जेमतेमच असुन शाळा खोल्या केव्हाही कोसळू शकतात अशा आशयाचे निवेदन पत्र शिक्षणमंत्र्यांपासुन सर्व संबंधीत जिल्हा यंत्रणेला दिले होते. या शाळा इमारतीचे बांधकाम दगड मातीत झालेले असून, ब्रिटीशकालीन असल्याने केव्हाही कोसळू शकते. अशाच परिस्थीतीत लहानगे विद्यार्थी शिक्षण घेत होते, यावेळी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी 1 महिण्याच्या आत आपला प्रश्‍न मार्गी लावला जाईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही हा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी सामुहिक आत्मदनहनाचा मार्ग अवलंबीला होता.

यावेळी सकाळीच प्रशासनाकडुन मोठा फौजफाटा शाळेभोवती तैनात केला होता, यानंतर सकाळी 10 च्या सुमारास गावातील तरूण, ग्रामस्थ, पालक प्रशासनाला दिलेल्या आत्मदहनाच्या ठिकाणी उपस्थीत झाले यावेळी ग्रामस्थांनी आक्रमकतेची भूमीका घेतली मात्र बेलवंडी पो.नि. पडवळ तसेच सहाय्यक पो.नि. हिवरकर यांनी ग्रामस्थांना प्रशासनाची बाजू समजावत वातावरण शांततेत ठेवले. मात्र काही काळ तणावग्रस्त परिस्थीती याठिकाणी पाहवयास मिळाली.

यानंतर पं.स.चे सभापती व अधिकारी वर्ग उपस्थीत झाले. सुरवातीला त्यांनी करु पाहु अशी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यास सुरु केली. नंतर मात्र सर्व तरुण, ग्रामस्थ यांनी तनावग्रस्त वातावराणात संताप व्यक्त केल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी यांचेशी दुरध्वनीवरुन संपर्क साधुन स्वहस्ताक्षरात, स्वाक्षरीत लेखी आश्‍वासन ग्रामस्थांना दिले. यानंतर त्याठिकाणचे वातावरण शांत झाले. अन्यथा याठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व तरुणवर्ग आत्मदहनाच्या तयारीतच होते. त्याची सर्व व्यवस्था तरुणांनी आजुबाजुला करुन ठेवल्याचे दिसून आले.


तसेच खा. दिलीप गांधी यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना समजावुन घेत ग्रामस्थांना समजावत आपल्या भावना शांत करण्याचे, कायदा व सुव्यवस्था शांत राखण्याचे तसेच लवकरच खासदार निधीमधुन मार्चपर्यंत प्रयत्न करुन केंद्रशासनचा मोठा निधी शाळा खोल्या बांधकामासाठी देण्याचे आश्‍वासन यावेळी लेखी पत्राद्वारे दिले. आमदार जगताप यांचेशीही दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मार्च अखेरीस स्थानिक निधीतुन 10 लाखांची तरतुद करण्याचे आश्‍वासन दिले.