Breaking News

भाविनिमगाव जगदंबा माता देवस्थानचा कारभार ग्रामपंचायतीने पहावा ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी : तसा ठराव एकमताने ग्रामसभेत संमत

भाविनिमगाव / वार्ताहर :- शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत येथील ग्रामदैवत जगदंबा माता (तुळजा भवानी देवस्थान) देवस्थानचा विकास खुंटला असुन येथील अनाधिकृत व्यवस्थापन मंडळ न्यायालयीन लढाईत मात्र देवस्थानचा पैसा खर्च करत असुन देवस्थानला येणारा शासकीय निधी राजकीय हेव्यादाव्या पोटी नाकारत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत विकास कामासाठी देवस्थानचा कारभार ग्रामपंचायतीने पहावा अशी मागणी ग्रामसभेत उदय शिंदे, संजय काळे, नंदराम दळे, चंद्रकांत थोरात आदींनी केली. या मागणीस ग्रामस्थांनी प्रतिसाद देत, आजपासून देवस्थानचा कारभार ग्रामपंचायतीने पहावा असा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेत संमत केला. 


येथील देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी दोन गट एकमेकांविरुद्ध न्यायालयात दाद मागत आहे तर नगर न्यायालयाने एका गटाच्या बाजुने निकाल दिला तर सध्या अनधिकृतरीत्या कारभार करत असलेले व्यवस्थापन मंडळ त्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात अपीलात असुन हे व्यवस्थापन मंडळ देवस्थानचा पैसा न्यायालयीन लढाईत खर्च करून देवस्थानच्या विकास कामांना बगल देऊन ग्रामस्थांची एकप्रकारे फसवणूक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी सभेत केला व विकास कामासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात देवस्थान असावे असा ठराव मंजूर केला. 

ग्रामसभेच्या सुरवातीला या वर्षीचे चौदाव्या वित्त आयोगातुन करावयाच्या कामाची माहिती ग्रामविकास अधिकारी जोशी यांनी सांगितली. सभेत गावात कृषी अधिकारी येत नसल्याची तक्रार अशोक थोरात यांनी केली त्यावर पंचायत समितीत तशी माहिती देऊ असे सांगितले. तर राहिलेले बंदिस्त गटार काम, रस्ता दुरूस्ती, वस्ती अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल काम, शाळा खोल्या दुरूस्ती व शौचालय दुरूस्ती, स्मशानभूमीत कंपाऊंड, वैयक्तिक शौचालयास प्रोत्साहन देऊन गाव हागणदारीमुक्त करणार आदी कामांना या वर्षी प्राधान्य देऊन कामे लवकर पूर्ण करणार असल्याचे सरपंच पांडुरंग मरकड यांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेत राम मुंगसे, अशोक थोरात, कुंडलिक काळे, दिपक जरे, आत्माराम शेळके, भाऊसाहेब काळे आदींनी सहभाग घेत विकास कामावर ग्रामसभेत चर्चा घडवली.