Breaking News

वेंगुर्लेत उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उद्धव ठाकरेंनी केले भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 28, जानेवारी - जिल्ह्यातील सर्व लोकांना लवकरच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सां गितले. वेंगुर्ले येथे नवीन 50 खाटांच्या रुग्णालयाचे भूमीपूजन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यासाठी होणारा खर्च जिल्ह्याच्या निधीतून खर्च करणार असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या कार्याने जगभर प्रसिद्ध झालेले कोकणचे सुपुत्र द्वारकानाथ कोटणिस यांच्या नावाने वेंगुर्ले येथे आयुर्वेदीक केद्र सुरू करणार असल्याची माहिती यावेळी केसरकर यांनी दिली. नवीन रुग्णालयामुळे तालुक्यातील डॉक्टरांची पदे वाढणार असून त्याचा लाभ लोकांना होणार असल्याचेही सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग हा जिल्हा डोंगराळ जिल्हा म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मानधनामध्ये मोठी वाढ होणार असून ती किमान एक लाख रुपयांची असेल. तालुक्यामध्ये डॉक्टर कमी असल्याविषयीची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, सध्या तालुक्यासाठी दोन नवीन डॉक्टर नियुक्त केले असून त्यापैकी एक डॉक्टर रुजू झाले आहेत. तसेच मानधनामध्ये वाढ केल्यामुळे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे उलब्ध होईल असा विश्‍वासही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.