Breaking News

उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणण्यासाठी धोरण तयार करण्याची ऊर्जामंत्र्यांची सूचना


राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने एक धोरण तयार करण्याची सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
याच बैठकीत नागपूरच्या पेंच व अन्य प्रकल्पांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर घेण्यासाठी महानिर्मिती व जलसंपदा तसेच महाऊर्जा या तीनही विभागांनी एक धोरण तयार करावे अशी सूचना ऊर्जामंत्री यांनी केली. उपसा सिंचन योजनेजवळील जागा सोलरसाठी वापरणे, पडीक किंवा खडकाळ जागेचाही शोध घेणे, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यासंदर्भात अभ्यास करणे व येत्या 15 दिवसात वरील विषयांवर अभ्यास करून धोरण तयार करून एका समितीचे गठन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक सुर्वे हे या समितीच्या अध्यक्षपदी राहतील. सदस्य म्हणून महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव, महावितरणचे सतीश चव्हाण, महापारेषणचे संचालक गणपत मुंडे व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव यांचा समावेश राहील. 30 दिवसात या समितीने अभ्यास करून आपला अहवाल द्यायचा आहे.