Breaking News

जळगावलगत समांतर रस्ते विकासाकरिता खा.ए टी नाना यांची सकारात्मक भूमिका

जळगाव, - समांतर रस्ते कृती समितीच्या मागण्या व महामार्ग रोको आंदोलन संदर्भात माझा व्यक्तिगत काहीही आक्षेप नाही. केंद्र सरकारने दिलेल्या कोटीत जर समांतर रस्ते होणार नसतील तर केंद्र सरकारकडून जादा निधी मागून आणायला मला या आंदोलनाचा उपयोगच होईल, अशी प्रांजळ भूमिका जळगाव मतदार संघाचे खासदार ए. टी. नाना पाटील यांनी समांतर रस्ते कृती समितीच्या सदस्यांशी चर्चा करीत व्यक्त केली. यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालयात समांतर रस्ते संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी सोबत आयोजित बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत स्थानिक आमदारांनी समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलनाविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याची चर्चा समोर आल्यानंतर समिती सदस्यांनी खासदार ए टी नानांशी चर्चेची तयारी दर्शविली. दरम्यान नानांनी स्वतःच समिती सदस्य विनोद देशमुख यांना समांतर रस्ते संदर्भात ते स्वतः मंत्रालयस्तरावर काय करीत आहेत याची माहिती दिली.