Breaking News

विद्यार्थ्यांसह पालकांनीही लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणी भेटी


विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक सहलींना अनन्यसाधारण महत्व असते. ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, कलात्मक आणि मनोरंजनात्मक ठिकाणांचा एकाच वेळी अभ्यास करण्याची एकमेव संधी केवळ सहलीतूनच मिळते. तालुक्यातील दत्तवाडी, कापसेवस्ती, काकडेवस्ती, उर्‍हेवस्ती व चव्हाणवस्ती या 5 शाळांची संयुक्त सहल नुकतीच 19 ते 21 जानेवारी 2018 या काळात संपन्न झाली. ओझर, लेण्याद्री यांसारखी अष्टविनायक स्थाने, किल्ले शिवनेरी, निसर्गरम्य माळशेज घाट, टिटवाळा-वज्रेश्‍वरी-गणेशपुरी-जीवदानी यांसारखी धार्मिक ठिकाणे, शेकडो म्हशी असलेला भिवंडी जवळील कामन येथील अंतरराष्ट्रीय भजनलाल तबेला, जीवदानी येथील रोपवेचा रोमांचक अनुभव, टिटवाळा येथील गजानन कलादालन, बोटींगची धमाल , गरम पाण्याच्या कुंडातील अंघोळी, शेळी पालन केंद्र , चिक्की कारखाना, स्वच्छ सुंदर किनारा लाभलेल्या भुईगाव बिचवरील खळाळत्या लाटांसोबत मस्ती, सुरुच्या बनातील फेरफटका आदी बाबींमुळे ही सहल संस्मरणीय ठरली. प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिलेली सविस्तर माहिती आणि उत्कृष्ट नियोजनामुळे ही सहल सर्वांच्या दृष्टीने आनंददायी व प्रेरक ठरली. या सहशालेय उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रविकिरण भोजने, विजय जेधे, आजीनाथ पालवे, वनमाला पुराणे, राही किरतवाड, अशोक जावळे, संतोष गर्जे, प्रमोद ढापले, सचिन तादगे, नागेश धुमाळ, गणेश कुमटकर, विकास शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अहमदनगर जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, बोर्लेचे सरपंच भारत काकडे यांनी सहलीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिवनेरी किल्ल्याची सविस्तर माहिती देताना गड किल्ल्याचे अभ्यासक, मा. सैनिक व मनिसर्गरम्य जुन्नर तालुका या वेबपेजचे निर्माते रमेश खरमाळे म्हणाले की, आजपर्यंत शेकडो सहलींना मार्गदर्शन केले, परंतु पालकांसह शैक्षणिक सहलीचे इतके सुंदर आयोजन आजपर्यंत कुठेच पाहिले नाही, या संपूर्ण सहलीचे नियोजन दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. मनोहर इनामदार यांनी अत्यंत केले.