आठवडे बाजारात वाहतुकीची प्रचंड कोंडी
येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयासमोरील आठवडे बाजार हा सध्या हळूहळू निम्म्या शहरात पसरला आहे. काही वर्षांपूर्वी भाजी विक्रेत्यांसाठी बाजारतळावर पालिकेकडून लाखो रुपये खर्चून ओटे बांधले होते. परंतु नंतर ते पुन्हा तोडून टाकण्यात आले. आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांसह, धान्य, मासे, मांस, कपडे, खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरातल्या विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी असतात. दिवसागणिक या बाजाराची व्याप्ती वाढत आहे. चोथानी हॉस्पिटलपासून ते पुढे संजीवन हॉस्पिटल पर्यंत तेथून पुढे मोर्गेवस्ती परिसरात बाजार पसरला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीविक्रेत्यांसह इतर अनेक वस्तू विकण्यासाठी विक्रेते बसलेले असतात. नागरिक रस्त्याच्या कडेला जमेल तिथं वाहने लावतात. स्टेट बँक चौक परिसर, जिजामाता चौक परिसर, बालिका शाळा परिसर, दमाणी हॉस्पिटल जवळ, नवीन मराठी शाळा परिसर, संगमनेर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ, शासकीय विश्रामगृहासमोर संगमनेर रस्त्यापर्यंत बाजाराची व्याप्ती वाढली आहे. दर आठवड्यला शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. महिला, शाळेतील बालकांसह नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना मोठा त्रास होत आहे. निम्म्या शहरात पसरणाऱ्या या बाजारावर उपाययोजना करून बाजारासाठी नगरपालिकेने योग्य जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.