राजा संभाजीचा इतिहास शुद्ध करण्याचे काम या महानाट्यातून आम्ही करतो
कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाज व नागरीकाचे वतीने नरशार्दुल राजा संभाजी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन दि १० फेब्रु ते १२ फेब्रु २०१८ असे तीन दिवस कर्जत येथील श्री सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी या ठिकाणी आयोजित केले आहे. या नाट्याचे लेखक इंद्रजीत सावंत, दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण, व राजा संभाजीची प्रमुख भूमिका करणारे हर्षल सुर्वे यांनी कर्जत येथे या नाटकाच्या तयारीची पाहणी करून तालुक्यातील विविध गावाना भेटी देऊन नागरीकामध्ये जनजागृती केल्यानंतर येथील सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्त्ये मोठ्या संखेने उपस्थित होते.
राजा संभाजी महाराजाचा इतिहास हा सर्वसामान्यात अत्यंत कलंकित सादर केला आहे. संभाजी महाराजाच्या मृत्यूभोवतीच फिरणाऱ्या अनेक नाटकांनी त्यात भरच घातली असून काही लेखकांनी ही वाईट प्रतिमा सादर केली आहे. त्यामुळे राजा संभाजीचा जीवनपट लोकांपुढे वास्तववादी यावा या विचाराने आपण इतिहासाचा अभ्यास करताना या नाटकाचे लेखन केले. या नाट्याचे लेखक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले की, या नाटकातील संवाद विविध बखरी, त्यांनी व छ. शिवाजी महाराज यांनी लिहिलेली पत्रे यावरून तयार केलेले आहे. त्याच्या जीवनचरित्राची कुठेही मोडतोड न होऊ देता, कोणाच्याही भावना दुखाऊ न देता हे नाटक उभे केले. अधिकृत सेन्सॉरची परवानगी घेऊन ते सादर केले जात आहे.
या नाटकाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांनी हे महानाट्य दोन मजली सेटवर साकार होते. यामध्ये दोनशे कलाकार काम करतात व मंचावर घोडे, उंट, बैलगाडी आदी पहावयास मिळते. आत्तापर्यत या नाटकाचे व महानाट्याचे ५० च्या आसपास प्रयोग केले असून बारामती, बार्शी, पुणे, सांगली, इचलकरंजी आदी ठिकाणी प्रेक्षकांनी दाद दिली आहे.