दखल - खडसे खरंच भाजपला सोडचिठ्ठी देतील?
शेकाप व भाकप, माकप सोडण्यासही अशी अनेकांवर वेळ आली. नगर जिल्ह्यात शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, गोविंदराव आदिक, बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, विजय औटी, बाळासाहेब थोरात, मधुकरराव पिचड, प्रसाद तनपुरे, बबनराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, शिवाजीराव नागवडे अशा कितीतरी नेत्यांवर ही वेळ आली. गोपीनाथ मुंडे यांच्या मनातही पक्षांतर करण्याचा विचार बळावत होता. त्यामुळं ज्यांनी भाजपच्या संघटना वाढीसाठी आयुष्य खर्च केले, त्या एकनाथ खडसे यांच्या मनात तसा विचार केला असेल, तर त्यांना दोष देता येणार नाही. पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देसाई, संभाजी निलंगेकर, रणजित पाटील अशा कितीतरी मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झाले. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिशी घातले. क्लीन चिट दिली. परंतु, खडसे डोईजड असल्यानं त्यांना मात्र भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड प्रकरणात गोवले. त्यांच्यावरील आरोपाची चौकशी झाली. परंतु, तरीही त्यांच्याबाबत काहीच निर्णय होत नाही.
खडसे यांनी याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या वागणुकीतून तसं दाखविलंही. तरीही मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही. अजित पवार यांच्या व्यासपीठावर जाऊन, तसंच नारायण राणे यांना पायघड्या घालण्याच्या मुद्यावरही त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. भाजपच्या चिंतन बैठकीला अनुपस्थिती दाखविली. राज्य सरकारची वारंवार कोंडी केली. गैरव्यवहार पकडून दिला. असं असलं, तरी खडसे यांच्याबाबत काहीच निर्णय घ्यायचा नाही, असं मुख्यमंत्र्यांना ठरविलेलं दिसतं. खडसे यांना काँग्रेस व राष्ट्रवादीनं त्यांच्या त्यांच्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं. परंतु, खडसे यांनी तरीही भाजप सोडणार नाही, असं वारंवार स्पष्ट केलं. असं असलं, तरी खडसे यांनी भाजप सोडून जावा, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात नाही ना, असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळं त्यांचा संयमही आता संपत आला आहे. पक्ष सोडण्याचा विचार नाही. पण, पक्षातील लोक मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षानं दूर केल्यास पर्याय उरणार नाही. राजकारणात काहीही शक्य आहे, अशा शब्दांत श्री. खडसे यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे.
काँगे्रसचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या एकसष्टी गौरव सोहळ्यात खडसे उपस्थित होते. खडसे आणि काँगे्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. उभय नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं नाराज झालेल्या खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली. आपण अशा काय भानगडी केल्यात, माझ्याबद्दल जाणून घेण्याची जनतेच्या मनात उत्सुकता आहे. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाका, असं खुलं आव्हान खडसेंनी या वेळी दिलं. आपण कुठं पैसा कमविला, कुठं भ्रष्टाचार केला, हे आपल्याला पक्षाकडून उत्तर हवं आहे, असा घरचा आहेर त्यांनी दिला. खडसे खरे स्वाभिमानी आहेत. परंतु, पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. अडचणीच्या काळात आमच्यासारख्या मित्रांची आठवण काढावी. नाथाभाऊ तुमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, असं खुलं आमंत्रण चव्हाण यांनी खडसे यांना दिलं. खडसे पक्ष सोडणार असल्याचं वृत्त वारंवार येत असलं, तरी प्रत्यक्षात ते पक्ष सोडतील, की नाही, याबाबत साशंकता आहे.