Breaking News

100 शाळा डिजिटल करण्याचे काम शिक्षक क्षेत्रात क्रांती घडविणारे - नारायण राणे

सिंधुदुर्ग, दि. 28, जानेवारी - आमदार नितेश राणे यांचे शंभर शाळा डिजिटल करण्याचे काम शिक्षक क्षेत्रात क्रांती घडविणारे आहे. टाटा कंपनी ट्रस्टच्या माध्यमातून आणलेली प्रत्येक योजना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तृत्य उपक्रम आहे. प्रत्येक क्षेत्रात डिजिटलने क्रांती घडविली आहे. त्यात आपली भावी पिढी ज्ञानी असावी, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हावी, प्राविण्य मिळवावे, शिक्षणाबरोबर व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावे, अशी दूरदृष्टी ठेऊन आमदार नितेश राणे करत असलेले काम कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात आमदार नितेश राणे यांच्या कामाची, बुद्धीमत्तेची आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी असणार्‍या आत्मिक तळमळीची बरोबरी करणारा एकही आमदार किंवा मंत्री नाही असे गौरोद्गार स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी मंजूर करून घेतलेल्या शंभर शाळा डिजिटल उद्घाटन क ार्यक्रमात ते बोलत होते. 


राणे म्हणाले, डिजिटल हे साधन आहे. त्याची पूर्तता करून योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. डिजिटलचे स्वरूप काय असते हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगावे. त्यासाठी शिक्षकांचा एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेऊन माहिती द्यावी अशी सूचना केली. 


संगणक आला तेव्हा जगात क्रांती घडली. आधुनिकतेच्या गोष्टी, विकासाची साधने गतिमान करण्यासाठी डिजिटल युगाचीच गरज आहे. जे देश प्रगत आहेत त्यांनी या डिजिटल युगाचाच पुरेपूर वापर केला. ब्रिटनसारख्या देशाचे दरडोई उत्पन्न 32 लाखांपर्यंत पोहोचले ते याचे डिजिटल पद्धतीच्या शिक्षणाने आणि संगणकीय शास्त्राचा परिपूर्ण उपयोग करू. आपला भारत देश, राज्य आणि समाज गतिमान दिशेने वाटचाल करावा असे वाटत असेल तर दर्जेदार शिक्षणाची गरज आहे,असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले मराठी शिक्षणा इतकीच इंग्रजी शिक्षणाची गरज आहे. इंग्रजित लिहिता येणे, बोलता येणे गरजेचे आहे. त्यासाठीच इंग्रजीला महत्व द्या. ज्या व्यक्तीची इंग्रजीवर कमांड नाही ती व्यक्ती कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. 

त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून आवश्यक त्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये पोचाव्यात, त्यांना योग्य ज्ञान आकलन व्हावे यासाठी हे डिजिटल शाळेचे प्रयत्न आहेत. देशाचे भवितव्य असणारी तरुण- तरुणी तरबेज असावेत, कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी परिपक्व बनावेत, त्याने गतिमान दिशेने वाटचाल करावी, कॉर्पोरेट क्षेत्रात गरुडझेप घ्यावी. यासाठी आ. नितेश राणे यांनी पहिल्या पासूनच डिजिटल शिक्षण पद्धतीवर भर दिला आहे. त्याचा स्वीकार करून  यशाची क्रांती घडवा असे, आवाहन राणे यांनी केले.