शेअर बाजारात भाजपाच्या विजयाची तेजी
मुंबई : गुजरातमध्ये सलग सहाव्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्याचा उत्सव शेअर बाजारात तेजीच्या रूपाने साजरा करण्यात आला. सकाळी भाजपा पिछाडीवर असताना शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती; पण दिवसाअखेर जेव्हा भाजपाचा विजय निश्चित झाला, तेव्हा शेअर बाजारातील तेजी देखील निश्चित झाली. बीएसई सेन्सेक्स १३८ अंक वधारून ३३६०१.६८ पातळीवर बंद झाला.
तसेच एनएसई निफ्टी ५५ अंक उसळून १०३८८.७५ पातळीवर विसावला.मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात ०.४१ टक्का, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत अनुक्रमे ०.७६ टक्का व ०.४५ टक्का तेजी आली. तसेच मुंबई शेअर बाजारात दिवसभरात एकूण २८२४ कंपन्यांच्या शेअरचे व्यवहार झाले. पैकी १४३२ कंपन्यांच्या शेअरचे भाव उसळले, १२१६ कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले, तर १७६ कंपन्यांच्या शेअरचे भाव अचल राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांपैकी मेटल निर्देशांकात १.८३ टक्के तेजी आली. त्याखालोखाल ऑटो आणि कंझ्युमर ज्युरेबल्स निर्देशांकात अनुक्रमे १.२१ टक्का व ०.९४ टक्का तेजी आली.