Breaking News

वीज न पोहोचलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार 40 हजार 959 गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.


आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील ६६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ३४ गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ३४ पैकी ३३ गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील ७ तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा १११ गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. 

यापैकी ५४ गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर ५७ गावांचे विद्युतीकरण हे महाउर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. ऑक्टोबर २०१७ अखेर महावितरण कंपनीमार्फत ५४ पैकी १४ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून महाऊर्जाद्वारे ५७ पैकी २८ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.