Breaking News

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत

गांधीनगर : भाजपने गुजरातचा गड राखल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता असून, विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला अशा दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं वृत्त नाकारलं आहे. 


केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय हेसुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जत आहेत. मांडवीय हे सौराष्ट्रातील नेते असून ते पाटीदार समाजातून येतात. गुजरात विधानसभेचे माजी सभापती वजूभाई वाला यांचे नावही चर्चेत आहे. वाला यांनी यापूर्वी गुजरातमध्ये अर्थ, कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी, 25 डिसेंबरला पार पडणार आहे. हा सोहळा सरदार पटेल स्टेडियम, साबरमती रीव्हरफ्रंट किंवा गांधीनगरच्या महात्मा मंदिरापैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे. 

1995 पासून म्हणजेच सलग 22 वर्ष भाजप गुजरातवर सत्ता करत आहे. 2012 मध्ये 116 जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी केवळ 99 जागांवरच समाधान मानावे लागले. तर काँग्रेसने 80 जागा मिळवल्या. 150 जागा मिळवण्याचा विश्‍वास व्यक्त करणार्‍या अमित शाह यांनी गुजरातचा गड राखला असला, तरी मुख्यमंत्रिपदी कोणाला संधी द्यायची, हा पेच आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकारी सध्या सरदार पटेल स्टेडियमवर पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत.