अवैध वाळू उपशामुळे भीमापात्र बनले बकाल
भीमा नदीच्या पात्रातुन वाळू उपसा करण्यासाठी फायबर बोटींचा वापर केला जात आहे.बोटींच्या वापरामुळे बोटीतील इंधनाचे थर पात्रात जमा होत आहेत.त्याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे.पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही कर्जत तालुक्याच्या हद्दीत वाळू माफियांनी सुरू केलेल्या हैदोसाने नदीपात्र बकाल बनले आहे.रात्रंदिवस वाळू उपसा चालू असल्याने येथे मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे.या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.बोटीतून होणाऱ्या सततच्या इंधन गळतीमुळे नदीपात्रात तवंग जमा होतात.
कित्येक फूट खोलीपर्यंत उत्खननातून वाळू काढली जात असल्याने मत्स्यबीजे नष्ट होत आहेत.माश्यांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत आहे.त्यामुळे मासे वाढीच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे.नदीपात्रात सर्वत्र बोटींचे साम्राज्य पसरल्याने मासेमारी व्यवसायिकांना मासे पकडण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.
सिद्धटेक,जलालपूर,खेड भागात महसूल विभागाने बोटी फोडण्याची अधुनमधुन कारवाई केली.मात्र त्याचा कुठलाच परिणाम येथील वाळू माफियांवर होत नाही.कारवाई संपताच त्यामागे मागे वाळु उपसा सुरु होतो.नगर जिल्ह्याच्या हद्दीतील वाळू उपसा करून वाळू पुणे जिल्ह्याच्या हद्दीत वाहून नेली जात आहे.माळढोक आरक्षणामुळे शासनाने नगर जिल्ह्यातील वाळू उपशावर निर्बन्ध लादले आहेत. या भागातील ग्रामपंचायतींनीही वाळू उपसा न करण्याचे ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतले आहेत.मात्र सध्या भीमापात्रात राजरोस वाळू उपसा सुरू आहे.
या अवैध वाळू उपशाला रोखण्याला तालुका तहसील कचेरी कमी पडत असून याला महसूल खात्याबरोबरच पोलीस खातेही तितकेच जबाबदार आहेत.तसेच काही मंडळींकडून मलीदा प्रवृत्तीमुळेच कारवाई होत नसल्याची या भागात चर्चा आहे.कर्जत तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांना भीमा नदीमुळे मोठा फायदा झाला आहे.शेतकऱ्यांला वरदान असलेल्या या नदीला मात्र वाळू माफियांनी घेरले आहे.नदी पात्रातील वाळुचा अवैधरीत्या उपसा करुन ठिकठिकाणी टाकाऊ वाळूचे उंचच्या उंच ढिगारे पहायला मिळत आहे.या नदीच्या पात्रातून लाखो रुपयांची वाळूचा उपसा यापुर्वीही झाला असून आताही तो जोमाने सुरू आहे.