डीसीबी बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न.
मुंबई : विक्रोळी, टागोरनगर परिसरातील अज्ञात लुटाऱ्याकडून डीसीबी बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अनोळखी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.
विक्रोळी, टागोरनगर क्रमांक १ मध्ये डीसीबी बँकेचे एटीएम सेंटर आहे. अशातच मध्यरात्रीच्या सुमारास काही लुटारूंनी येथील एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन पूर्णपणे तोडण्यात आले. मात्र, त्यांना पैसे काढण्यात यश आले नाही. सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाला एटीएम लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समजले. त्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
त्यानुसार, याची माहिती विक्रोळी पोलिसांना देताच, तत्काळ त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. परिसरातील दुकानदार, रहिवासी तसेच भाड्याने राहत असलेल्या नागरिकांकडेही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे