Breaking News

वाळूच्या महसुलाचा वाटा गावाला: नवीन वाळू धोरणात तरतूद करू - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

वाळूच्या ठेक्यातून मिळणाऱ्या महसुलाच्या वाटा त्या गावाला देणे, गावाने मान्यता दिल्याशिवाय वाळू काढण्याचे ठेके दिले जाणार नाहीत आदी तरतुदी नवीन वाळू धोरणामध्ये करण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

जालना जिल्ह्यात अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये तहसीलदार आणि ठेकेदारांनी संगनमताने वाळूमध्ये केलेल्या अपहारप्रकरणात सदस्य विनायक मेटे यांनी मांडलेल्या सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. पाटील यांनी यावेळी माहिती दिली की, या अपहार प्रकरणामध्ये विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. 

ते पुढे म्हणाले की, वाळूचोरी प्रकरणात कारवाई करण्यास गेलेल्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे वाळूचोरी विरोधात कारवाईप्रसंगी संरक्षणासाठी शासकीय निधीतून खासगी सुरक्षारक्षक घेता येईल अशी तरतूद नवीन वाळू धोरणामध्ये करण्यात येईल, असेही श्री. पाटील म्हणाले. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अमरसिंह पंडित यांनीही सहभाग घेतला.