Breaking News

देशाच्या विकासात सिंधी समाजाचे महत्त्वाचे योगदान - राज्यपाल


मुंबई, दि. १८ :युद्ध किंवा अन्य कारणांमुळे विस्थापित झालेले समाज बरेचदा दारिद्र्य आणि विपन्नतेच्या गर्तेत सापडतात. मात्र फाळणीमुळे सर्वस्व गमावले असतानादेखील सिंधी समाजाने केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि मृदु स्वभाव यांच्या जोरावर नव्या प्रांतात पाय रोवून शून्यातून संपन्नता निर्माण केली. सिंधी समाजाचे उदाहरण जगाच्या इतिहासात अन्यत्र अभावानेच दिसून येते. गेल्या सात दशकांमध्ये सिंधी समाजाने भारताच्या, महाराष्ट्राच्या तसेच मुंबईच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
जागतिक सिंधी परिषदेच्या (वर्ल्ड सिंधी कौन्सिल) वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला,त्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते.
सिंधी समाज आज जगभर विखुरला आहे. त्यामुळे सिंधी भाषा आणि सिंधीयतचे जतन करणे आव्हानात्मक झाले आहे. अशा वेळी सिंधी समाजाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून जगभरातील सिंधी व्यक्तींना आणि विशेषतः युवकांना जोडून भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, अशी सूचना राज्यपालांनी केली. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमधे सिंधी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.