Breaking News

सरकारने जर बुलेट ट्रेन सुरू केली, तर ती दुसऱ्या देशात जाईल - अजित पवार

सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणावरून जिवंत माणसाला जाळून मारणारं हे सरकार असल्याची घणाघाती टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २६) भाजप सरकारला लक्ष्य केले. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी सरकारविरोधात 'हल्लाबोल' आंदोलन करण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. 


पवार पुढे म्हणाले, सरकारला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही. पोलीसच माणसांना जाळून मारायला निघाले असतील, तर सरकारची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे सिद्ध होते. दिल्लीवरून कोल्हापूरला निघालेली शेतकऱ्यांची रेल्वे मध्यप्रदेशात पोहोचली. या सरकारने जर बुलेट ट्रेन सुरू केली, तर ती दुसऱ्या देशात जाईल, असा टोलाही पवार यांनी भाजप सरकारला लगावला. 

या सरकारचा हातगुणच वाईट असून ते फक्त फेकाफेकी करण्यात पटाईत असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले, खड्डे पडले म्हणून आभाळ फाटले का, असे भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात. त्यावर आधी खड्डे बुजवा मग बोला, असा टोला पवारांनी त्यांना लगावला.