Breaking News

मारहाण प्रकरणी तिघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे, दि. 04, नोव्हेंबर - गॅरेजमध्ये डॉ. आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो का लावले अशी विचारणा करत गॅरेज मालकास तिघांनी मारहाण व जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील झिंजुर्डे, सुधीर झिंजुर्डे व एक असम यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन मल्लिकार्जून कांबळे (वय 32 रा.दत्तवाडी आकुर्डी, मूळ उस्मानाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांच्या फिर्यादीनुसार, पिंपळे सौदागर येथे ओमसाई ऑटो गॅरेज नावाने कांबळे यांचे एका भाड्याच्या गाळ्यामध्ये गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेज जवळून झिंजुर्डे वस्तीकडे एक रस्ता जातो. पंधरा दिवसांपूर्वी झिंजुर्डे वस्ती येथील सुनील झिंजुर्डे, सुधीर झिंजुर्डे या दोघांनी त्यांना गॅरेजमध्ये तू डॉ. आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो का लावतो म्हणून कांबळे यांना जातीवाचक अपशब्द वापरत फोटो काढण्यास सांगितले. कांबळे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत याची पोलिसांकडे तक्रार केली नाही केवळ जागा मालक पूजा कदम यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता कांबळे दुकानात काम करत असताना आरोपी व रस्त्यावरुन जाणारा एक अनोळखी इसम यांनी तू सांगूनही फोटो का काढले नाहीत, असे म्हणत कांबळे यांना जातीवाचक अपशद्ब वापरत मारहाण केली. याप्रकरणी तीन आरोपीं विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.