Breaking News

संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही - सुप्रिया सुळे

पुणे, दि. 04, नोव्हेंबर -फडणवीस सरकार म्हणजे दळभद्री सरकार आहे, शेतकर्‍यांना त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या विविध 11 मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपाला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पाठींबा देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुळे बोलताना पुढे म्हणाल्या की, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. परंतु, शेतकर्‍यांसाठी काही न करता हे सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन तसेच पुणे आणि नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाच्या मागे आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु शेतकर्‍यांकडे या सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. वकील, डॉक्टर, शिक्षक आदींना आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करण्याची वेळ येते तर मग हे सरकार कोणाचे आहे ? असा प्रश्‍न सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. स्वच्छता अभियानाबाबत मोदी बोलतात परंतु हे स्वच्छता अभियान पाहिले आमच्या सरकारने राज्यात केले आहे.भाजपच्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नात वापरलेले विजेचे बील अध्यक्षांनी भरले नाही. मात्र शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज हे सरकार बंद करते. त्यामुळे या सरकारचा निषेध करते, असे सुळे म्हणाल्या. या सरकारला आपण 10-15 दिवस वेळ देऊ नंतर जर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास या आंदोलनात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता उतरेल, असे सुळे म्हणाल्या.