Breaking News

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर 93 रुपयांनी महागला

सोलापूर, दि. 04, नोव्हेंबर - विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात तब्बल 93 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना नाही. मात्र रोखीने वाढीव रक्कम द्यावीच लागेल. फरकाचा परतावा अनुदानाच्या रूपाने बँक खात्यावर जमा होणार आहे. नोव्हेंबरपासून या नव्या दराचा अंमल सुरू झाला. यंदा 246 रुपयांचे अनुदान गॅसधारकांना मिळेल. गॅसचे दर दरमहा बदलतात. त्यात चार ते पाच रुपयांचा चढ-उतार दिसून यायचा. सामान्यांना त्याचे काही वाटत नव्हते. परंतु यंदा तब्बल 92 रुपयांची वाढ झाल्याने ग्राहक अचंबित झाले. नोव्हेंबरच्या विनाअनुदानित घरगुती गॅसचे दर आहेत 738 रुपये. गेल्या महिन्यात (ऑक्टोबर) हाच दर 645 रुपये होता. म्हणजेच 93 रुपयांची ही वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावरून गॅसचे दर निश्‍चित होतात. त्यानंतर दरमहा संबंधित कंपन्यांच्या संकेेतस्थळांवर हे दर जाहीर केले जातात. प्रतीक्षा संपलेली नाही ऐन दिवाळीच्या तोंडावरच विरतकांकडे गॅसचा तुटवडा होता. ऑनलाइन मागणी नोंदवल्यानंतर सध्या 10 दिवसांची प्रतीक्षा आहे. ती अद्याप संपलेली नाही. दिवाळीत मोठा वापर झाल्याने ऑनलाइनवर मागणीचा जोर वाढला. तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त आहे. त्याची कोंडी फोडण्यासाठी वितरकांनी ’कॅश अँड कॅरी’ सुरू केली. त्यामुळे ग्राहक थेट गोदामांकडे धावताहेत.