चिचोंडी पाटील शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह
चिचोंडी पाटील शिवारातील कोकाटे यांच्या विहिरीजवळ एक शर्ट व चप्पल असल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी त्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांना विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने काही निदर्शनास आले नाही. मात्र संशय आल्याने त्यांनी नगर तालूका पोलीस ठाण्यात या घटनेची कल्पना दिली. सहाय्य्क पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सुमारे तीन तासानंतर त्या विहिरीतील पाणी विद्युत मोटारद्वारे बाहेर काढून तपासणी केली असता संदीप गायकवाड याचा मृतदेह आढळून आला. ही घटना आत्महत्या की घातपात, असा संशय पोलीसांनी व्यक्त करत तपासाला सुरवात केली आहे. दरम्यान, नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधिक्षक मनिष कलवाणिया यांनी घटनास्थली भेट देउन पाहणी केली. याप्रकरणी नगर तालूका पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
