पैशाच्या वादातून तरुणाला रेल्वे पटरीवर ढकलून दिले
रवींद्र नाना दांडगे (२८,रा. चेतनानगर, हर्सूल) असे पीडित तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले, की रवींद्रला बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोपाल प्रकाश भुतेकर (रा. काळूबाची नळणी, ता. भोकरदन, जि. जालना) याने फोन करून विश्रांतीनगर भागात बोलावून घेतले.
या वेळी त्याच्या सोबत अन्य दोन जण होते. दरम्यान, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर गोपाल भुतेकर व रवींद्र यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर भुतेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रवींद्रला मारहाण करत हातपाय बांधले. त्यानंतर त्याला कसले तरी औषध पाजून विश्रांतीनगरजवळील रेल्वेपटरीवर ढकलून दिले. दरम्यान, रवींद्रने आरडाओरड केल्यामुळे त्या परिसरातील काही नागरिक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. रवींद्रने भुतेकरकडून दोन लाख रुपये घेतले होते.
