Breaking News

अर्भक मृत्यू रोखण्याच्या उपाययोजनांबाबत महाराष्ट्र व केरळच्या आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा

मुंबई, दि. 14, ऑक्टोबर -  केंद्र शासनातर्फे नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एसआरएस अहवालात केरळचा अर्भकमृत्यू दर 10 तर महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर 21 वरून 19 एवढा असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल केरळ राज्याचा दौरा करीत तेथील आरोग्य संस्थांची पाहणी केली. तसेच अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी केरळमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली.
या भेटी संदर्भात अधिक माहिती देताना मंत्री डॉ. सावंत म्हणाले, केरळमधील कोझीकोडे येथील शासकीय महिला व बाल रूग्णालयास भेट दिली. या आरोग्य संस्थेची इमारत ही ब्रिटीशकालीन असून त्यांच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. अन्य शासकीय रूग्णालयांच्या इमारतींमध्ये देखील स्वच्छता ठेवल्याचे दिसून आले.
रूग्णालयातील कर्मचारी कॅप, मास्क, मोजे घातल्याशिवाय रूग्णांच्या जवळ जात नाहीत. संसर्ग टाळण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. नातेवाईकांनाही ठराविक वेळीच भेटू दिले जाते. नातेवाईकांची अनावश्यक गर्दी रोखण्यावर केरळच्या आरोग्य विभागाने भर दिल्याचे दिसून आले. केरळ येथील आरोग्य यंत्रणेची संरचना वेगळी आहे. एसएनसीयू, लेबर रूम येथील जंतू संसर्ग आटोक्यात आणून त्यामुळे होणारे अर्भकमृत्यू रोखण्यास केरळ आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. एकंदरीतच राज्याची लोकसंख्या लक्षात घेता आणि होत असलेल्या उपाययोजना यामुळे केरळला अर्भक मृत्यू दर कमी करण्यास यश मिळाल्याचे जाणवले.
महाराष्ट्रातही अर्भकमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केरळमधील चांगल्या उपाययोजना राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.