Breaking News

भीतीपोटी शिवसेना सत्तेत कायम; अजित पवार यांचा टोला

नागपूर, दि. 14, ऑक्टोबर - एकीकडे सरकारच्या न पटणार्‍या धोरणांमुळे होणारी घुसमट, त्यातून केली जाणारी शाब्दीक टीका आणि दुसरीकडे सत्ता सोडल्यास आमदार फुटतील ही भीती आशा कात्रीत सापडलेल्या शिवसेनेची अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपुरात लगावला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. पवार आणि तटकरे यांच्या विदर्भ दौर्‍याची सुरुवात शुक्रवारी नागपूरपासून झाली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची भाजपसोबत अक्षरश: फरफट सुरु आहे. त्यांची धोरणे पटत नसल्याने त्यांच्यावर शिवसेना टीकाही करते. न पटणारी धोरणे, सत्तेची लाचारी आणि आमदार फुटण्याची भीती अशा कोंडीत शिवसेना सापडली असल्याचे पवार म्हणाले. भविष्यात मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा, अशी रस्सीखेच सुरु होण्याची शक्यता असून त्यातून घोडेबाजार भरण्याची शक्यता पवार यांनी वर्तविली.
नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेचा आमदार भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार करतो. त्यांची तिकीटे वाटतो आणि आपल्याच पक्षाकडे पाठ फिरवतो. हे चित्र केविलवाणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते तर आमदाराची अशी हिंमत झाली असती काय? असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला.