Breaking News

देशाला बौद्धिकदृष्ट्या विकलांग करण्याचा संघाचा प्रयत्न - तुषार गांधी

पुणे, दि. 08, ऑक्टोबर - इतिहास घडविण्यापेक्षा इतिहासाचे विकृतीकरण करणे सोपे असल्याने, देशाला बौद्धिकदृष्ट्या विकलांग करण्याचे प्रयत्न संघाकडून सुरु  आहेत, असा आरोप महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ मध्ये ‘जाती भेद आणि वर्तमान’ या विषयावर खुल्या संवादाच्या  कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक मिलिंद आव्हाड हे ही या संवाद कार्यक्रमात सहभागी  होते. 
पुढे बोलताना तुषार गांधी म्हणाले, गांधी हत्येची पुन्हा सुनावणी करण्याची मागणी हा गांधी हत्येबाबत सत्य आणि तथ्य दडविण्याच्या प्रयत्नाचा पुढील अध्याय आहे.  खोटेपणा प्रमाणित करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका ही तुषार गांधी यांनी या कार्यक्रमात केली. गांधी तत्वाला विरोध करत प्रतिगामी शक्तींना गांधींच्या मांडीवर  बसायचे आहे. इतिहासाचे विकृतीकरण करायचे आहे. अशा वेळी लोकशाहीवादी विचारांच्या आणि चळवळींमधील विखुरलेल्या, उदासीनता अधिक धोकादायक आहे.  महात्मा गांधी भय, कमजोरी, त्रुटी यावर मात कर महात्मा झाले. पण, सध्याच्या नेतृत्वात हा प्रामाणिकपणा नाही. 56 इंची नेतृत्वात घमंड जास्त आणि  जबाबदारीची भावना कमी आहे. त्यांच्यातील पोकळपणा आपल्याला आता दिसू लागला आहे.  प्रा. मिलिंद आव्हाड म्हणाले, पूर्वीच्या राजवटीतील राजकीय वाद  आणि आत्ताच्या राजवटीतील राजकीय वाद पाहिले की धोका लक्षात येतो. कन्हैया कुमार, जेएनयू विद्यार्थ्यांवरील आरोप, गोरक्षकांचा उना मधील धिंगाणा, लव्ह  जिहाद, घर वापसी असे नॉन इश्यू पुढे आणले जात आहेत. लोकशाहीवादी संस्था, चळवळी संपवल्या जात आहेत. सत्याचा अपलाप करून वेगळीच कथा प्रसवणे,  हे उजव्या शक्तींचे प्रमुख काम आहे. उजव्या शक्तींच्या राजकीय, सामाजिक धोरणांपेक्षा आता आर्थिक धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ वाईट कृत्ये करताना काँग्रेस जनांना अपराधीपणा वाटायचा, तो किमान खासगीत व्यक्त तरी व्हायचा, आता वाल्याचा वाल्मिकी करून  आपल्याकडे घेण्यासाठी न थांबता ‘वाल्या’च पक्षात घेतला जात आहे. या सर्व प्रतापांविरुद्ध अखिल भारतीय पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे.‘