Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक मद्य व ताडी विक्रीस बंदी आदेश जारी

सांगली, दि. 14, ऑक्टोबर - सांगली जिल्ह्यातील माहेंबर व डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीकरिता, सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान व मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत संबधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-2, एफएल-3, फॉर्म ई, ई-2, एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2, सीएल-3, टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंदचा कालावधी व कंसात बंदचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे. निवडणूक लगतपूर्व व मतदानाचा दिवस रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2017 व सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी पूर्ण दिवस (सांगली जिल्ह्यातील माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणार्‍या ग्रामपंचायत हद्दीतील), तसेच मतमोजणीचा/ मतमोजणीचे दिवस मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होईल त्या ठिकाणी) सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्पष्ट केले आहे.