Breaking News

सोयाबीन खरेदीसाठी तालुकास्तरावरील कमाल उत्पादकता ग्राह्य धरावी - सदाभाऊ खोत

मुंबई, दि. 31, ऑक्टोबर - राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी मंडलनिहाय हेक्टरी उत्पादकता निश्‍चित करुन त्यातील कमाल उत्पादकता तालुका  सरासरी म्हणून ग्राह्य धरावी आणि त्याप्रमाणे शेतकर्‍यांकडून सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  आज दिले. किमान आधारभूत दराने शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन, उडीद व मूग आदीच्या कमाल खरेदी प्रमाणाबाबत बैठक श्री. खोत यांच्या  अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 
नाफेडकडून 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही अतिरिक्त 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच्या तयारीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश  देऊन श्री. खोत म्हणाले की, राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी आणताना चांगल्या  दर्जाचा कृषीमाल आणणे गरजेचे आहे. सोयाबीनची खरेदी करण्याची परवानगी शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळेही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी  होईल. सध्या 121 सोयाबीन खरेदी केंद्रे, 86 मूग खरेदी केंद्रे तर 87 उडीद खरेदी केंद्रे सुरु आहेत. शेतकर्‍यांकडून हा कृषीमाल खरेदी करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता  बाळगून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम करावे, असेही श्री. खोत यावेळी म्हणाले.