Breaking News

नागपूर क्रीडा संकुलाचे अडथळे दूर करण्याचे कामगार मंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार्‍या क्रीडा संकुलाचे उर्वरित काम त्वरित हाती घेण्यात यावे, असे निर्देश कामगार मंत्री श्री.संभाजीराव निलंगेकर यांनी दिले आहेत.
मुंबईत सद्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी (दि.13 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत मंत्री महोदयांनी हे आदेश दिले. नागपूरचे आमदार श्री.सुधाकर कोहळे, सहसचिव (कामगार) श्री.अरुण विधळे, कामगार मंत्र्यांचे खासगी सचिव श्री.मारुती मोरे, अवर सचिव श्री.संजीव गुप्ते, कल्याण आयुक्त श्री.सतीश दाभाडे,नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता श्री.संजय चिमुरकर, वास्तुशास्त्रज्ञ श्री.शशी प्रभु, प्रकल्पाचे कंत्राटदार श्री.नीलेश जामदार आदी यावेळी उपस्थित होते.
सदर प्रकल्पाचे काम 2004 मध्ये हाती घेण्यात आले होते. तथापी, तांत्रिक कारणास्तव सदर प्रकल्प 2010 पासून रखडला होता. नागपूरमध्ये मौजा हरपूर येथे 9.50 एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून उदयोन्मुख खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होऊ शकतील. सदर प्रकल्पात 15 बाय 25 मीटरचा जलतरण तलाव आहे. फुटबॉल मैदान, अँथलेटीक ट्रक आहे. शिवाय, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे. तसेच इनडोअर हॉल असून यात बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉली बॉल, हॅन्ड बॉल, ज्युदो कराटे, नेट बॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेट लिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स, योगा, अरोबिक्स आदींसाठी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. प्रकल्पात 400 मीटरच्या सिंथेटिक ट्रकचा समावेश असणार आहे.
मा.मुख्यमंत्री महोदयांकडे यापुर्वी सदर प्रकल्पाबाबत बैठक झाली होती. त्यात मंडळाचे शासनाकडे असलेल्या थकीत निधीतून सदर प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यास मुख्यमंत्री

महोदयांनी मान्यता दिली होती. त्यानुसार सदर निधीतून प्रकल्पाचे उर्वरित पूर्ण करण्याबाबत शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली. तुर्तास मंडळाकडे असलेल्या संचित निधीतून प्रकल्पाचे काम सुरु करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली असून याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी दिले आहेत.
सदर प्रकल्पातील अडचणी दूर होऊन हा प्रकल्प मार्वी लागावा, यासाठी आमदार कोहळे यांनी कामगार मंत्र्यांकडे विनंती केली होती. 2004 मध्ये हाती घेण्यास आलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत 12 कोटी होती. प्रकल्पाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मागील 7 ते 8 वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे सुमारे 7 कोटींची गुंतवणूक होऊन देखील कामगारांना तसेच नागपूरकरांना या प्रकल्पाचा कोणताही लाभ होऊ शकला नाही. नवीन जिल्हा दरसूचीनुसार आता या प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामासाठी सुमारे 30 कोटींची आवश्यकता आहे. सदर प्रकल्प मार्गी न लागल्यास त्याच्या किंमतीत वाढ होत राहील. ही बाब लक्षात घेता कामगार मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.
या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधिक अधिकार्‍यांना दिल्या आहेत. प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण कालमर्यादा निश्‍चित करावी. तसेच क्रीडा संकुल उभारतांना जागतिक दर्जाचे निकष पाळण्यात यावेत आणि राज्याच्या वैभवात भर पडेल याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना कामगार मंत्र्यांनी केल्या. अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार कोहळे यांनी नागपूरकरांच्या वतीने कामगार मंत्र्यांचे आभार मानले.