Breaking News

राजकारणात संयम बौध्दिक मानसिक परिपक्वता आवश्यकच..!

दि, 15, ऑक्टोबर - राजकारणात संयम,बौध्दीक आणि मानसिक परिपक्वता किती आवश्यक आहे या विषयी याच स्तंभातून प्रतिपादन केले होते.याची प्रचिती देणार्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या.या तीन्ही घटनांचा परस्परांशी तसा कुठलाही संबंध नसला तरीही राजकारण म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानणार्या त्या सगळ्या प्रवृत्ती माञ तोंडघशी पडल्याच्या निदर्शक आहेत.
पहिली घटना आहे नाशिकची.गांभिर्य नष्ट करणारे राजकीय विदुषक या शिर्षकाखाली राजकारणातील संधी साधूंवर भाष्य करण्याचे धाडस केले होते.आमचे हे धाडस काही निष्ठावंतांना भयंकर प्रमाद वाटला.अर्थात सध्या ही मंडळी सोबत आहेत म्हणून निष्ठावंत .आजच्या राजकारणात निष्ठा आणि विष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्या मंडळींनी त्यांच्या एकूण वयापेक्षाही अधिक काळ निस्वार्थ भावनेने केलेल्या पञकारीतेला अधिष्ठान  शिकविण्याचे धाडस दाखवावे हेच मुळी अपरिपक्वतेचे पहिले लक्षण आहे.अंधभक्तीसंयमांला समुळ नष्ट
करते.सदर्भीत संपादकीयमध्ये मुद्दा काय मांडला आहे,संदर्भ काय आहेत,त्यामागचा हेतू काय,केलेली टीका नेत्याच्या फायद्याची की तोट्याची याचा कुठलाही सारासार विचार न करता नेत्याशी असलेली बांधिलकी किती निष्ठेची आहे हे सिध्द करण्याच्या उतावळेपणात तात्काळ व्यक्त होत या लेखाचा सत्ताधार्यांशी नसलेला संबंध जोडून आपले अगाध ज्ञान सोशल मिडीयावर प्रसविले.खरेतर हा विषय पुन्हा उजागर करण्याची इच्छा नव्हती पण काळ सोकावू नये म्हणून या विषयाला नाइलाजास्तव चर्चेत घ्यावे लागले. सदर नेत्याशी निष्ठा व्यक्त करू पाहणारे सदगृहस्थ या स्थानापर्यंत कसे पोहचले याचीही एक कथा आहे.पण आमचे लेखन संस्कार ही कथा सांगण्याची परवानगी देत नाही.सबब अधिष्ठान,स्वच्छता,सत्तेचे लांगूलचालन  या बाबी अजूनही स्वत्व न विकलेल्या  पञकारीतेला सकाळ सायंकाळ निष्ठा बदलणार्या नेत्यांच्या बगलबच्यांनी शिकवू नये.त्याऐवजी हा वेळ आणि ही उर्जा राजकारणात अत्यावश्यक असलेल्या संयम,बौध्दीक मानसिक परिपक्वता समृध्द करण्यात खची घालावी.दुसरी घटना आहे अहमदनगरची.विद्यमान राजकारण आणि राजकारणातील तरूण पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी.पाथर्डीचे माजी आमदार ,अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विशेषतः सहकार  क्षेञात मोलाचे योगदान असलेले म्हणूनच दाबदबा असलेले स्व.राजीव राजोळे यांना श्रध्दांजलीपर लेखात जेष्ठ नेते यशवंतरावजी गडाख यांनी राजकारणाला विशेषतः झेंडे घेऊन नेत्यांची बंडी धरून फरफटणार्या तरुणाईला उपदेश आणि त्यातून डोळ्यात घातलेले अंजन  महत्वाचे आहे.गडाख हे जूने जाणते नेते आहेत.राजकारणातील पक्षीय भुमिकेचा अपवाद सोडला तर अजात शञू म्हणून गडाखांचा आदर केला जातो.त्यांनीही आपल्या लेखांतून नेत्यांमागे फरफटणार्या तरुणाईला जमिनीवर राहून वास्तविक जीवन जगण्याचा दिलेला सल्ला संयम बौध्दीक आणि मानसिक परिपक्वता शिकवतो.
तिसरी घटना नांदेडच्या महापालिका निवडणूकीशी संबंधित आहे.भाजपाचा पराभव का झाला? यावर अनेक कारणे सांगितली जातात.माञ किनार्यावर बसून सागराच्या पोटातील हालचाली तपासण्यासारखी ती कारणे आहेत.समुद्राच्या पोटात शिरून केलेले निरिक्षण त्या हालचाली अधिक सुक्ष्मपणे टिपू शकते.नांदेड मनपात भाजपा पराभवाचे कारणही भाजपाशी निष्ठा असलेला सामान्य कार्यकर्ताच सांगू शकतो.तो प्रयत्न प्रविण जेठावाड या निष्ठावंत पण भाजपाने निलंबीत केलेल्या कार्यकर्त्याने केला.भाजपाच्या प्रवक्त्या श्‍वेता शालिनी आणि प्रविण जेठावाड यांच्यात झालेले भ्रमणध्वनी संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे,हे संभाषण ऐकल्यानंतर शत प्रतिशतच्या नादात सत्ताधार्यांचा सुटलेलासंयम ,घसरलेली बौध्दीक आणि मानसिक परिपक्वता या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होते.