Breaking News

चिखलीकरांची उणिव देवेंद्राने काढली भरून

टोळी पकडली पण सरदाराच्या मुसक्या कधी आवळणार...?

कुमार कडलग/दि, 15, ऑक्टोबर - सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ आणि वरिष्ठांचे संगनमत असते म्हणूनचा भ्रष्टाचार,गैरव्यवहार फोफावतो असा सोदाहरण दावा लोकमंथनने मनोरा आमदार निवास इमारतीतील गैरव्यवहाराच्या निमित्याने काल परवाच केला होता,त्याची प्रचिती दुसर्याच दिवशी नाशिक साबांच्या तीन लाचखोर अभियंत्यांना सापळ्यात अडकवून एसीबीने सप्रमाण दिली.लाच प्रकरणावरून निलंबीत असलेले कार्यकारी अभियंता सतिश चिखलीकर यांना गुरूवार दि.12 आक्टोबर 2017 रोजी कोकणभवन संकल्पचिञला रूजू होण्याचे आदेश प्राप्त होणे,चिखलीकर यांनी स्वीकारल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे  शुक्रवार दि.13 आक्टोबर 2017 रोजी नाशिक साबांतील तेव्हढ्याच तोलामोलाच्या कार्यकारी अभियंत्यांसह आणखी दोन अभियंत्यांना लाखोंची लाच घेतांना अटक होण्याचा योग जुळून येणे बर्याच गुपीतांचे निदर्शक आहे.या दोन्ही प्रकरणात एक साम्य असल्याचे बोलले जाते.चिखलीकर प्रकरणात तत्कालीन पालकमंञ्यांचा थेट संबंध जोडला गेला होता,तर या ताज्या प्रकरणात विद्यमान  पालकमंञ्यांचा अप्रत्यक्ष संबंध जोडला जात आहे,राजकीय वरदहस्त आणि वरिष्ठ अभियंत्यांचे मार्गदर्शन या लाच प्रकरणाच्या मुळाशी असल्याने एसीबीने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे अपेक्षित आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात बांधकाम बोकाळला आहे,ही आता बातमी राहीली नाही.जेंव्हा एखाद्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता साबां काम पुर्ण करते,कंञाटदाराचे बील प्रामाणिकपणे अदा केले जाते तेंव्हा खरे तर ती बातमी ठरते,पण दुर्दैवाने अशी बातमी करण्याची संधी पञकारांना मिळत नाही.किंबहूना क्वचितच मिळते.भ्रष्टाचाराच्या बाबतीत नेहमीचेच.कोळसा उगाळून उगाळून काळाच   राहणार म्हणून त्याही बातम्या कालांतराने बकफूटवर जातात.आणि मग एखाद्या दिवशी अचानक एखादी ब्रेकींग येतेः नाशिकच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार,सचिन पाटील आणि शाखा अभियंता अजय देशपांडे तीन लाखाची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात.ही होते आमच्यासाठी बातमी.खरा मुद्दा बातमीचा नाही तर या बातमी मागच्या बातमीत दडलेल्या मर्माचा आहे.हे लाचखोरीचे प्रकरण काय ? कंञाटदार कोण आहे ? या खोलात जाण्याचे कारण नाही.ते एव्हाना व्हायरल झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कुठलेही काम एकमेकांशी संबंधीत असते.मुख्यअभियंत्यांपासून थेट शाखा अभियंत्यांपर्यंत हा संबंध असतो.थोडक्यात हे टीमवर्क असते.एखादा प्रोजेक्ट राबवितांना त्या प्रोजेक्टवर ही मंडळी आपल्या पदाप्रमाणे राबत असते.म्हणूनच त्या प्रोजेक्टच्या यशापयशात ही मंडळी सहभागी असते.यशाचे श्रेय त्या सगळ्यांना असते.त्याच धर्तीवर एखाद्या कामात गैरव्यवहार झाला असेल तर तो अमूक एका व्यक्तीने केला असे म्हटले जात असले तरी त्या गैरव्यवहाराला केवळ निर्देशीत व्यक्ती जबाबदार असते असे नाही तर त्याचे इतर सहकारी विशेषतः वरिष्ठ अभियंता खर्या अर्थाने जबाबदार असतात. शुक्रवारच्या लाच प्रकरणातही हीच बाब विचारात घ्यायला हवी.साबांत लाच किंवा भ्रष्टाचार ही व्यक्तीगत बाब राहीली नाही,तर त्याचे त्या त्या टप्यावर वाटप करण्याची जुनी प्रथा साबांत आहे.म्हणूनच केवळ रंगेहाथ पकडला म्हणून चोर ठरलेल्या अभियंत्यावर कारवाई तर व्हावीच पण पडद्याआड राहून मलिदा खाणार्या वरिष्ठ अभियंत्यांचीही निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.
नाशिक साबांच्या बाबतीत बोलायचे झाले तर समृध्दी महामार्गाचा सर्व्हे सुरू असतांना अनेक साबां अभियंत्यांनी संभाव्य महामार्ग नजरेसमोर ठेऊन महामार्गाच्या कुशीत करोडोच्या जमीनी शेतकर्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या आहेत.नाशिकला वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या काही अभियंत्यांनी सोलापूरलाही जमिनी खरेदी केल्या आहेत.तात्पर्य हे की अशा लाखो करोडोच्या जमिनी खरेदी करण्यासाठी या सरकारी चाकरांकडे एव्हढा पैसा येतो कुठून? या प्रश्‍नाचे उत्तर शुक्रवारच्या लाचप्रकरणात आहे.हे प्रकरण उघड झाले म्हणून त्याची चर्चा सुरू आहे.एरवी नाशिकच्या बांधकाम भवनमध्ये बसून हे वरिष्ठ अभियंता कंञाटदारांच्या माना पिरगळून लाखोंची कमाई करतात.म्हणूनच या प्रकरणाच्या निमित्ताने केवळ त्या तीन लाचखोर अभियंत्यांची चौकशी न करता नाशिक साबांच्या वरिष्ठ अभियंत्यांचीही तितक्याच तिव्रतेने चौकशी झाली तर कनिष्ठ वरिष्ठ अभियंत्यांचे भ्रष्टाचारात,लाच प्रकरणात कसे लागेबांधे आहेत यावर प्रकाश टाकता येईल.
यापूर्वी कार्यकारी अभियंता चिखलीकर यांनाही एसीबीने पकडले होते.त्यांच्याकडून करोडोचे घबाड जप्त केले होते.चिखलीकर हे तत्कालीन साबांमंञी आणि नाशिकचे पालकमंञी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात होते.चिखलीकरांचा वनवास संपला आणि गुरूवार दि.12 आक्टोबर 2017 रोजी त्यांनी कोकणभवनच्या संकल्पचिञचा पदभार स्वीकारला.त्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 13 आक्टोबर रोजी चिखलीकरांइतकाच किंबहूना विद्यमान राजकीय परिस्थितीत भारदस्त असलेले कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार आपल्या दोन सहकार्यांसह लाच घेतांना रंगेहाथ कडण्याचा दुर्दैवी योग जुळून आला.चिखलीकरांची उणिव पवारांनी भरून काढली.चिखलीकरांना तत्कालीन पालक मंञ्यांचा थेट आशीर्वाद होता तर पवारांना आपल्या भाकड सासूबाईंच्या माध्यमातून थेट विद्यमान पालकमंञ्यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद लाभल्याची चर्चा आहे.तत्कालीन पालकमंञीबांधकामात तरबेज होते तर विद्यमान पालकमंञी सिंचनात.पवार यांचे यांचे सासरेही साबांत उत्कृष्ट,कर्तव्यदक्ष,प्रामाणिक  अभियंता म्हणून सुपरिचित आहेत.
थोडक्यात राजकीय वरदहस्त आणि वरिष्ठ अभियंत्यांची सहेतूक कृपा याशिवाय लाखो रूपयांची लाच घेण्याचे धाडस कुठलाही अभियंता करीत नाही.साबांतील भ्रष्टाचार हेही एक टीम वर्क आहे.या टोळीतील तीन सदस्य केवळ अडकलेत.टोळीचे सरदार अजून पडद्याआड आहेत त्यांच्याही मुसक्या आवळण्याच्या दिशेने एसीबीने पाऊल टाकावे.एव्हढीच अपेक्षा.