आपुलकीची दिवाळी उपक्रमातून गरजूंना फराळाचे वाटप
कोल्हापूर, दि. 14, ऑक्टोबर - आपण दिवाळी साजरी करतांना समाजातील एक वर्ग असा आहे, ज्यांना दोन वेळचे पोटभर अन्नही मिळत नाही. त्यामुळे दिवाळीचा फराळ त्यांच्या घरी बनतच नाही. अशा गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, आपुलकीची दिवाळी, हा उपक्रम राबविला जाणार आहे. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या सहकार्यातून तसेच लोकसहभागातून, आपुलकीची दिवाळी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याअंतर्गत खासदार धनंजय महाडिक स्वखर्चातून सुमारे 5 हजार कुटुंबियांना फराळाचे वाटप करणार आहेत. बुंदी लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, शंकरपाळी, बाकरवडी आणि सोनपापडी अशा पदार्थांची पिशवी समाजातील उपेक्षित घटकांना दिली जाणार आहे. या उपक्रमात कोल्हापूरच्या दातृत्वशील आणि संवेदनशील जनतेचाही सहभाग अपेक्षित आहे. ज्या नागरिकांना गोरगरिबांसाठी फराळ द्यायचा असेल, त्यांनी फराळाची पिशवी, बसंत-बहार टॉकीज जवळील कैलाश टॉवर्स येथे असलेल्या, भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात किंवा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या राजेश मोटर्स शेजारील कार्यालयात आणून द्यावी. आदित्य कॉर्नर जवळील, पुरोहित स्वीटस् येथे आपुलकीची दिवाळी अंतर्गत फराळाच्या पिशव्या बनवल्या जातील. गोरगरिबांच्या मुखात दिवाळीचा फराळ पडावा, यासाठी दानशूर लोकांनी तेथून फराळाची पिशवी खरेदी करुन, भागीरथी संस्था किंवा धनंजय महाडिक युवाशक्ती कार्यालयात आणून द्यावी. जनतेने दिलेल्या फराळाच्या पिशव्यांचे योग्य ठिकाणी वाटप करुन, आपुलकीची दिवाळी उपक्रम पार पडेल. आपण आपल्या कुटुंबियांसह आनंदाने दिवाळी साजरी करत असताना, ज्यांच्या घरात आर्थिक परिस्थितीअभावी दिवाळीचे पदार्थ बनत नाहीत, त्यांनाही सामावून घेऊ या. आजवर कोल्हापूरच्या जनतेने सामाजिक बांधिलकी दाखवत अनेक पथदर्शी उपक्रम यशस्वी केले आहेत. आता खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, आपुलकीची दिवाळी या उपक्रमालाही कोल्हापूरकर उदंड प्रतिसाद देतील. मंगळवार 17 ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत, आपण फराळाची पिशवी जमा करु शकता. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या फराळाचे वाटप केले जाईल. आपल्याकडून आलेली फराळाची पिशवी एका घरातील आबालवृद्धांचा आनंद फुलवणारी असेल. अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण फराळ वाटप करुन, दिवाळीचा स्नेह आणि आपुलकी वाढवूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवी पाटील - 9075147788, श्री. सनी भवड - 8698807123, किंवा शरयू भोसले यांच्याशी 9075217788 या क्रमांकावर संपर्क साधावा.